IPL 2021: आयपीएल 14 साठी Shreyas Iyer फिट झाला नाही तर, कॅप्टन्सी भूमिकेसाठी Delhi Capitals कडे आहेत ‘हे’ 5 पर्याय

पुणे येथे झालेल्या पहिल्या भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या एकदिवसीय सामन्यात अय्यरच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. अय्यरच्या दुखापतीने दिल्ली कॅपिटल्सला घाम फोडला आहे आणि आयपीएल 2021 साठी त्यांच्या नियमित कर्णधार उपलब्ध नसल्यास त्यांना कर्णधारपदासाठी काही पर्याय शोधावे लागतील.

श्रेयस अय्यर दुखापत (Photo Credit: PTI)

Shreyas Iyer Injury: दिल्ली कॅपिटलचा (Delhi Capitals) कर्णधार श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) आयपीएल (IPL) 2021 मध्ये सहभाग होणे संशयास्पद आहे. पुणे येथे झालेल्या पहिल्या भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) पहिल्या एकदिवसीय सामन्यात अय्यरच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. ज्यामुळे त्याला मैदान सोडून स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून तो उर्वरित सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही, अशी माहिती बीसीसीआयने दिली. 8व्या ओव्हरमध्ये शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने मारलेला शॉट अडवताना श्रेयसच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. तो मैदानावर खाली पडला आणि त्याला वेदना होत असताना दिसले. अशी दुखापत सामान्यत: संपूर्णपणे बरी होण्यासाठी काही आठवडे लागतात आणि काहीवेळा शस्त्रक्रियेची गरज पडते. अय्यरच्या दुखापतीने दिल्ली कॅपिटल्सला घाम फोडला आहे आणि इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 14 साठी त्यांच्या नियमित कर्णधार उपलब्ध नसल्यास त्यांना कर्णधारपदासाठी काही पर्याय शोधावे लागतील.

1. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)

दिल्ली कॅपिटल्ससाठी पर्यायी कर्णधार म्हणून रहाणे हे स्पष्ट पर्यायांपैकी एक आहे. मुंबई क्रिकेटपटूकडे आयपीएल संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे आणि तो भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार देखील आहे. त्याने राजस्थान रॉयल्स आणि राइजिंग पुणे सुपरजायंटचे 25 आयपीएल खेळांमध्ये नेतृत्व केले असून त्यापैकी नऊ सामने जिंकले आहेत.

2. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) 

शॉने त्याच्या सुरुवातीपासूनच कर्णधार म्हणून त्याची योग्यता सिद्ध केली आहे. त्याने भारताच्या अंडर-19 वर्ल्ड कप विजयी संघाचे नेतृत्व केले आणि दबावात शांत असतो. यंदाच्या विजय हजारे करंडक स्पर्धेदरम्यान 21 वर्षीय तरूणाने पुन्हा एकदा कुशलतेचे प्रदर्शन केले आणि संघाला विजेतेपद पटकावून दिले. त्यामुळे, जर तो फलंदाजीद्वारे सातत्य राखू शकला तर अय्यरच्या अनुपस्थितीत कर्णधारपदासाठी तो सर्वोच्च निवड ठरू शकतो.

3. स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) 

आयपीएलच्या लिलावात दिल्लीने स्टिव्ह स्मिथचा समावेश करत संघाचा फलंदाजी क्रम मजबूत केला आहे. स्मिथची बॅटिंग वगळता त्याचे कुशल नेतृत्व देखील संघाच्या कामगी येऊ शकते. स्मिथने यापूर्वी पुणे वॉरियर्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि राजस्थान रॉयल्सचे यशस्वी नेतृत्व केले आहे. अशास्थितीत, दिल्लीने स्मिथकडे नेतृत्व दिले तर ते नक्कीच फायद्याचे ठरू शकते.

4. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)

अश्विन संघाचे नेतृत्व करण्यासाठी आणखी एक मनोरंजक पर्याय आहे. आयपीएलमध्ये ऑफ स्पिनरचा रहाणेपेक्षा चांगला रेकॉर्ड आहे आणि तो खेळाचा एक महान विचारवंत आहे. अश्विनच्या नेतृत्वात यापूर्वी पंजाब किंग्जने (पूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब) 28 पैकी 12 सामने जिंकले आहेत. त्यामुळे, कर्णधार म्हणून कसोटीचा अनुभवी खेळाडू यंदा हंगामात संघासाठी काही वेगळ्या कल्पनेने नेतृत्व करू शकतो.

5. अ‍ॅलेक्स कॅरी (Alex Carey)

सहसा, आयपीएल संघ परदेशी क्रिकेटपटूकडे कर्णधारपद सोपवून परदेशी खेळाडूची एक जागा रोखण्यास प्राधान्य देत नाहीत. तरीही ऑस्ट्रेलियन फलंदाज एक अपवाद ठरू शकतो. अय्यरच्या अनुपस्थितीत, यष्टिरक्षक फलंदाज पहिल्या चारमध्ये फलंदाजी करू शकतो आणि ज्यामुळे रिषभ पंत वरील अतिरिक्त भार कमी होईल. कॅरीने बिग बॅश लीगच्या अ‍ॅडिलेड स्ट्रायकर्सचे नेतृत्व केले असून 16 पैकी सात सामने जिंकले आहेत.

विशेष म्हणजे, मागील वर्षी आयपीएल 2020 मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्व दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदा टूर्नामेंटच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे श्रेयस स्पर्धेला मुकल्यास दिल्लीला नवीन पर्याय वापरावे लागतील.