IPL 2020 स्थगित होण्याच्या मार्गावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवल्याने टूर्नामेंटच भविष्य निश्चित

पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाउन 19 दिवसांनी वाढवून 3 मे पर्यंत केले आहे. यासह इंडियन प्रीमियर लीगचं (आयपीएल)13 व सत्रही पुढे ढकलले जाण्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी सकाळी 10 वाजता देशाला संबोधित केले. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) करण्यात आलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाउनचा आज, 14 एप्रिलला शेवटचा दिवस होता. दरम्यान, पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले आणि लॉकडाउन (Lockdown) कालावधी वाढविला. पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाउन 19 दिवसांनी वाढवून 3 मे पर्यंत केले आहे. यासह इंडियन प्रीमियर लीगचं (Indian Premier League)13 व सत्रही पुढे ढकलले जाण्याचं जवळपास निश्चित झालं आहे. यामुळे आता 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल पुढे ढकलण्याचा किंवा रद्द करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) घ्यावा लागेल. बीसीसीआय बुधवारी 15 एप्रिल रोजी किंवा येत्या काही दिवसात लीग स्थगित केले जाण्याची घोषणा करू शकते. आयपीएलचा 13 वा हंगाम 29 मार्चपासून सुरू होणार होता, परंतु कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे टूर्नामेंट 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. (Coronavirus: देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्यात आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा)

बीसीसीआय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय जाहीर करते आणि 15 एप्रिल रोजी नवीन मार्गदर्शक सूचना काय म्हणतात याची वाट पहात होते. तथापि, यंदा आयपीएल किमान 3 मेपूर्वी सुरू होणार नाही, ज्याची बीसीसीआयला अधिकृतपणे घोषणा करण्यासाठी पुढे यावे लागेल हे आता स्पष्ट झाले आहे. खुद्द, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सध्याच्या स्थितीत आयपीएलचे आयोजन होणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले होते. 3 मे नंतर जर रुग्ण समोर आले तर ते खूप कठीण होईल असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

दरम्यान, आयपीएल 2020 च्या भविष्यावर अजूनही अनिश्चितता आहे. ही लीग मे महिन्यात सुरू होणार नाही, कारण तोपर्यंत परिस्थिती कोरोना विषाणूची स्थिती सुधारण्याची लक्षणं दिसत नाही. मात्र, बीसीसीआय लीग स्थगित करते की रद्द हे पाहणे महत्वाचे ठरेल. शिवाय, मागील काही दिवसांपासून भारतीय बोर्ड आयपीएलचे आयोजन करण्यासाठी दुसऱ्या विंडोच्या शोधात असल्याचे म्हटले जात आहे. यंदा आयपीएल आयोजित करण्यासाठी बीसीसीआयकडे जून ते डिसेंबर या काळात वेळ आहे, परंतु आंतरराष्ट्रीय कॅलेंडरवर त्याचा परिणाम होईल. अशा परिस्थितीत यावर्षी या लीगचे भविष्य अडचणीत आहे.