IPL 2020 Eliminator मधील पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात करणार बदल, फ्रँचायझीला आयपीएल 2021 लिलावाची प्रतीक्षा

आरसीबीला भारतीय फलंदाज परदेशी खेळाडूंवर जास्त अवलंबून असल्याचे आढळून आल्याने आरसीबी आता विशेषत: मधल्या फळीत भारतीय खेळाडूंचा मुख्य गट वाढवेल अशी अपेक्षा केली जात आहे. बेंगलोर क्रिकेट ऑपरेशनचे संचालक माईक हेसन यांनी भारतीय खेळाडूंना प्राधान्य देण्याचे संकेत दिले.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: Twitter/IPL)

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे (Royal Challengers Bangalore) यंदा देखील आयपीएलचे (IPL) विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंग झाले. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) एलिमिनेटर सामन्यात 6 विकेटने पराभवासह आरसीबीचे (RCB) स्पर्धेतून पॅकअप झाले. इंडियन प्रीमियर लीगच्या गुणतालिकेत चौथे स्थान मिळवलेल्या आरसीबीला भारतीय फलंदाज परदेशी खेळाडूंवर जास्त अवलंबून असल्याचे आढळून आल्याने आरसीबी आता विशेषत: मधल्या फळीत भारतीय खेळाडूंचा मुख्य गट वाढवेल अशी अपेक्षा केली जात आहे. बेंगलोर क्रिकेट ऑपरेशनचे संचालक माईक हेसन (Mike Hesson) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की ते प्रथम लिलावाबाबतच्या तथ्यांची पुष्टी करतील आणि त्यानंतर धोरण ठरवतील. हेसन यांनी भारतीय खेळाडूंना प्राधान्य देण्याचे संकेत दिले आणि ते म्हणाले की, "खेळाडूंचा मूळ गट चांगला आहे. आम्हाला फक्त काही बदलांची गरज आहे यात काही शंका नाही. आपण मधल्या फळीबद्दल बोलतो. हे केवळ परदेशी खेळाडूंच्या मदतीने दुरुस्त करता येणार नाही. आम्हाला ते कसे बळकट करावे लागेल हे पाहावे लागेल कारण आपण एका भागास बळकटी देऊन दुसर्‍यास दुर्बल ठेवू शकत नाही." (Gautam Gambhir on Virat Kohli Captaincy: 'आठ वर्षांचा कालावधी मोठा, RCB ने विराट कोहलीच्या पुढे विचार करावा', IPL एक्सिटनंतर गौतम गंभीरने साधला निशाणा)

ते म्हणाले, "म्हणून आम्ही भारतीय खेळाडूंचा कोर गट तयार करण्याच्या विचारात आहोत." न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक म्हणाले की वॉशिंग्टन सुंदर आणि देवदत्त पडिक्क्ल यांचे आगमन ही त्यांच्या योजनेचा एक भाग आहे. आरसीबीने यापूर्वीच संघाबद्दल चर्चा सुरू केली आहे पण लिलावाविषयी स्पष्ट माहिती मिळण्याच्या ते सध्या प्रतीक्षेत आहे. हेसन म्हणाले, "हा बदल पुढच्या आठवड्यात नक्कीच होईल. आमची आधीच चर्चा झाली आहे. आम्हाला प्रथम थोडीशी माहिती  मिळावी, मग तो छोटा लिलाव होईल की मोठी, याचा शोध घ्यावा लागेल, पण खेळाडूंचा मूळ गट चांगला आहे."

दुसरीकडे, यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीने चांगली सुरुवात केली, पण नंतर त्यांची गाडी रुळावरून घसरली आणि अखेरच्या पाच सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. शिवाय, आयपीएल आता अंतिम टप्प्यात पोहचले असून फक्त दोन सामने शिल्लक आहेत. मुंबई इंडियन्स यापूर्वीच फायनलमध्ये पोहचले असून दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील दुसऱ्या क्वालिफायरच्या विजेत्या संघाशी विजेते पदासाठी मंगळवार, 10 नोव्हेंबर रोजी लढत होईल.