India's Playing XI for 2nd Test: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेच्या दुसर्या टेस्ट सामन्यात अर्ध्या टीम इंडियामध्ये होणार बदल, पहा कसा असेल प्लेइंग इलेव्हन
सलामी जोडीपासून गोलंदाजी विभागात अनेक बदल दुसऱ्या सामन्यात पाहायला मिळणार आहे. पहिल्या सामन्यातील खेळानुसार पृथ्वी शॉच्या जागी शुभमन गिलला कसोटी पदार्पणाची संधी मिळताना दिसत आहे.
India's Playing XI for 2nd Test: मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbourne Cricket Ground) होणाऱ्या दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) मॅचसाठी यजमान ऑस्ट्रेलियाने (Australia) त्यांचा प्लेइंग इलेव्हन नुकताच जाहीर केला आहे. अॅडिलेडमधील विजयी कांगारू संघ मेलबर्नच्या मैदानावर उतरण्यासाठी सज्ज आहे अशी घोषणा संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी केली. मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हन (India Playing XI) मोठे बदल अपेक्षित आहेत. पहिल्या सामन्यात लज्जास्पद पराभव झालेल्या टीम इंडिया (Team India) आपला अर्धा प्लेइंग इलेव्हन बदलणार असल्याचं दिसत आहे. सलामी जोडीपासून गोलंदाजी विभागात अनेक बदल दुसऱ्या सामन्यात पाहायला मिळणार आहे. पृथ्वी शॉला आपल्या खराब कामगिरीचा फटका बसण्याचेही दिसत आहे. बीसीसीआयने बुधवारी भारतीय संघाचा मेलबर्न येथे सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला ज्यात युवा शुभमन गिलसह अनेक खेळाडू नेटमध्ये सराव करताना दिसले. (IND vs AUS 2nd Test: भारताविरुद्ध बॉक्सिंग डे टेस्ट मॅचसाठी असा असणार ऑस्ट्रेलियाचा Playing XI, कोच जस्टिन लँगरने केली घोषणा)
पहिल्या सामन्यातील खेळानुसार पृथ्वीच्या जागी शुभमनला कसोटी पदार्पणाची संधी मिळताना दिसत आहे. पृथ्वीने पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावात मिळून फक्त 4 धावाच केल्या होत्या. शिवाय, नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत केएल राहुलला पाचव्या स्थानी संधी मिळू शकते. राहुलने यापूर्वी मर्यादित ओव्हरच्या मालिकेत प्रभावी कामगिरी केली होती. रिद्धिमान साहाला देखील बाहेर केले जाऊ शकते आणि त्याच्या जागी ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध सराव सामन्यात नाबाद शतकी खेळी केलेल्या रिषभ पंतला स्थान दिले जाऊ शकते. या शिवाय, हनुमा विहारीच्या जागी रवींद्र जडेजाचा फिट असल्यास समावेश केला जाऊ शकतो. जडेजाने मर्यादित ओव्हर मालिकेत मधल्या फळीत जबाबदारीने फलंदाजीचे प्रदर्शन केले होते. जडेजा प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील झाल्याने अश्विनला फिरकी विभागात साथीदार मिळण्याचीही चिन्हे वाढतात. दुसरीकडे, गोलंदाजी विभागात एक बदल होताना दिसत आहे. मोहम्मद शमीला पहिल्या सामन्यात दुखापत झाल्याने त्याला संपूर्ण मालिकेला मुकावे लागत असल्याने त्याच्या जागी मोहम्मद सिराजचा समावेश केला जाऊ शकतो. आयपीएलनंतर सराव सामन्यात देखील सिराजने शानदार प्रदर्शन केले आहे आणि सिराज आता गोलंदाजी विभाग सांभाळत मेलबर्नमध्ये कसोटी पदार्पणासाठी सज्ज होत असेल.
पहा कसा असेल प्लेइंग इलेव्हन: मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कॅप्टन), केएल राहुल, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.