टीम इंडियाचा अष्टपैलू Yusuf Pathan याने केली क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, 'हा' पराक्रम करणारा जगातील एकमेव क्रिकेटपटू
युसुफने पाकिस्तानविरुद्ध 2007 टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पदार्पण सामन्यात तो विजेतेपदाचा मानकरी ठरला. एखाद्या खेळाडूने वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमधून डेब्यू करत विजेतेपद पटकावण्याची ही पहिलीच वेळ होती.
भारताचा अष्टपैलू युसुफ पठाणने (Yusuf Pathan) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पठाणने भारताकडून 57 एकदिवसीय सामने आणि 22 टी-20 सामने खेळले व निळ्या जर्सीतील एक प्रभावशाली खेळाडू म्हणून ओळख निर्माण केली. दुर्दैवाने, युसूफकडे 2012 नंतर निवडकर्त्यांनी दुर्लक्ष केला ज्यामुळे त्याला पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. तथापि, दमदार फलंदाजाने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मुंबई इंडियन्स विरुद्ध आयपीएल 2010 हंगामात पठाणचे-37 चेंडूतील शतक हे अजूनही स्पर्धेच्या इतिहासातील दुसरे आणि भारतीय फलंदाजाने केलेले सर्वात वेगवान आहे. त्याने अखेर 2019 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून (Sunrisers Hyderabad) इंडियन प्रीमियर लीग खेळली पण, त्याला फ्रँचायझीने रिलीज केल्यानंतर 2020 हंगामात त्याला एकही खरेदीदार मिळाला नाही.
युसुफ पठाणने 2007 टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पदार्पण सामन्यात तो विश्वविजेतेपदाचा मानकरी ठरला. एखाद्या खेळाडूने वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमधून डेब्यू करत विजेतेपद पटकावण्याची ही पहिलीच वेळ होती. निवृत्तीची घोषणा करताना पठाणने लिहिले की, "मी माझे कुटुंब, मित्र, चाहते, संघ, प्रशिक्षक आणि संपूर्ण देशाचे मनापासून समर्थन आणि प्रेमाबद्दल आभारी आहे." टीम इंडियामधील आपल्या कार्यकाळात युसुफ हा अस्सल अष्टपैलू खेळाडू होता आणि त्याने फलंदाजी व बॉल दोन्हीने संघात योगदान दिले. श्रीलंकेविरूद्ध टी-20 सामन्यात आपला भाऊ इरफान पठाणबरोबरची मॅच-विनिंग भागीदारी कदाचितच त्याचे चाहते विसरू शकतील. एकूणच युसूफने 41 एकदिवसीय सामन्यांमध्ये 810 धावा केल्या. प्रामुख्याने फलंदाज म्हणून त्याने 27च्या सरासरीने तीन अर्धशतक आणि दोन शतके ठोकली 33 विकेटही घेतल्या.
18 टी-20 सामन्यात 146.58च्या शानदार स्ट्राइक-रेटने 236 धावा आणि 13 विकेट घेतल्या. दुसरीकडे, आयपीएलमध्ये एकंदरीत युसुफ पठाणने 174 सामन्यात 143 च्या निकटच्या स्ट्राईक रेटने 3204 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 13 अर्धशतके आणि एक शतकही ठोकले. 2007 मध्ये राजस्थान रॉयल्स, 2012 आणि 2014 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना अष्टपैलूने तीन वेळा आयपीएल विजेतेपद जिंकले व प्रत्येक वेळी आपल्या संघासाठी त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.