IND vs ENG 3rd ODI: भारताने पाच गडी राखून जिंकला सामना, हार्दिक-पंतची शानदार खेळी, मालिका 2-1 ने खिशात
एजबॅस्टन कसोटी गमावल्यानंतर टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जबरदस्त पुनरागमन केले. संघाने टी-20 मालिका आणि त्यानंतर वनडे मालिका जिंकली.
तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा (IND vs ENG) पाच गडी राखून पराभव केला. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियासमोर 260 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऋषभ पंतचे (Rishabh Pant) शानदार शतक आणि हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) स्फोटक खेळीमुळे टीम इंडियाने हे लक्ष्य 5 विकेट्स गमावून पूर्ण केले. यासह भारतीय संघाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टी-20 नंतर वनडे मालिका 2-1 ने जिंकली. भारताने पहिला वनडे सामना 10 गडी राखून जिंकला, तर दुसरी वनडे इंग्लंडने 100 धावांनी जिंकली. एजबॅस्टन कसोटी गमावल्यानंतर टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जबरदस्त पुनरागमन केले. संघाने टी-20 मालिका आणि त्यानंतर वनडे मालिका जिंकली.
Tweet
ऋषभ पंतने ठोकले शानदार शतक
ऋषभ पंतने निर्णायक सामन्यात शतक झळकावले तेव्हा भारताने 38 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. यष्टीरक्षक फलंदाजाचे वनडे कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. पंतने 106 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. पंत शतक करूनच थांबला नाही, तर संघाला विजय मिळवून देऊनच पॅव्हेलियनमध्ये परतला. पंतने 113 चेंडूत 125 धावा करून नाबाद राहिला. शतक झळकावल्यानंतर त्याने शेवटच्या 7 चेंडूत 6 चौकार मारत 25 धावा केल्या. (हे देखील वाचा: IND vs ENG 3rd ODI: जोस बटलरचा रवींद्र जाडेजने घेतला अफलातुन झेल, पाहा व्हिडिओ)
हार्दिकने घेतले चार बळी
तत्पूर्वी, सुरुवातीच्या धक्क्यातून सावरलेल्या इंग्लंडने 45.5 षटकांत 259 धावा केल्या. यजमानांकडून कर्णधार जोस बटलरने 60, जेसन रॉयने 41, मोईन अलीने 34, क्रेग ओव्हरटनने 32 आणि बेन स्टोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 27-27 धावा केल्या. भारताकडून हार्दिकने चार बळी घेतले. त्यांच्याशिवाय युझवेंद्र चहलने तीन आणि मोहम्मद सिराजने दोन तर रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली.