India vs Afghanistan 2026 Full Schedule: एकमेव कसोटी आणि ३ एकदिवसीय सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या वेळ आणि मैदाने

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात जून 2026 मध्ये एक कसोटी आणि ३ एकदिवसीय (ODI) सामन्यांची द्विपक्षीय मालिका खेळवली जाणार आहे.

Gautam Gambhir And Shubman Gill (Photo Credit- X)

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या आगामी भारत दौऱ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. जून २०२६ मध्ये खेळवल्या जाणाऱ्या या मालिकेमध्ये दोन्ही संघांदरम्यान एकमेव ऐतिहासिक कसोटी सामना आणि त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय (ODI) मालिका होणार आहे.

आयपीएल हंगाम संपल्यानंतर भारतीय संघाचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय सामने असणार असून, देशातील विविध प्रमुख मैदानांवर हे सामने खेळवले जातील. क्रिकेट चाहत्यांसाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

न्यू चंदीगडमध्ये रंगणार एकमेव कसोटी सामना

या दौऱ्याची सुरुवात दोन्ही संघांमधील एकमेव कसोटी सामन्याने होणार आहे. हा सामना ६ जून ते १० जून २०२६ दरम्यान न्यू चंदीगड येथील मैदानावर खेळवला जाईल.

भारतीय वेळेनुसार हा सामना रोज सकाळी ९:३० वाजता सुरू होईल. दोन्ही संघांसाठी कसोटी क्रिकेटमधील आपली कामगिरी सुधारण्याची आणि नवीन रणनीती आखण्याची ही एक उत्तम संधी मानली जात आहे.

तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि मैदाने

कसोटी सामन्यानंतर दोन्ही संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आमनेसामने येईल. एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने वेगवेगळ्या मैदानांवर आयोजित करण्यात आले असून सर्व सामने डे-नाईट (D/N) स्वरूपाचे असतील. हे सर्व एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होतील.

पहिली वनडे: १३ जून २०२६, शनिवार – हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला.

दुसरी वनडे: १७ जून २०२६, बुधवार – भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ.

तिसरी वनडे: २० जून २०२६, शनिवार – एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई.

दोन्ही संघांचे नेतृत्व आणि युवा खेळाडूंना संधी

या घरच्या मालिकेसाठी भारतीय संघाच्या कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही स्वरूपाच्या कर्णधारपदाची धुरा युवा फलंदाज शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे, तर के. एल. राहुल उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळेल.

भारतीय संघात जसप्रीत बुमराहसारख्या काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून अनेक युवा चेहऱ्यांना संघात स्थान मिळाले आहे. यामुळे नव्या खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

दुसरीकडे, अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व हशमतुल्ला शाहिदी करणार असून अनुभवी फिरकीपटू रशीद खान आणि फलंदाज इब्राहिम जाद्रान यांना कसोटी सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली असली, तरी एकदिवसीय मालिकेसाठी त्यांच्यावर संघाची मुख्य भिस्त असेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement