IND-W vs SA-W 2021 Series: एक वर्षानंतर मैदानावर उतरणार महिला टीम इंडिया, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 'या' शहरात होऊ शकते टी-20 व वनडे मालिकेचे आयोजन

भारत आणि दक्षिण आफ्रिका महिलांमध्ये नियोजित आठ सामन्यांची मालिका 7 मार्चपासून होण्याची शक्यता आहे. पाच टी -20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका लखनऊ किंवा कानपूर या दोन्ही ठिकाणी बायो-बबलमध्ये होणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी दिली.

भारत महिला क्रिकेट संघ (Photo Credit: Getty Images)

IND-W vs SA-W 2021 Series: आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप फायनलच्या (Women's T20 World Cup) एक वर्षानंतर भारतीय महिला टीम क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहे. भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) महिलांमध्ये नियोजित आठ सामन्यांची मालिका 7 मार्चपासून होण्याची शक्यता आहे. पाच टी -20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका लखनऊ किंवा कानपूर या दोन्ही ठिकाणी बायो-बबलमध्ये होणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या (BCCI) एका अधिकाऱ्यांनी दिली. या मालिकेसाठी 22 सदस्यीय भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. या मालिकेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसले तरी त्यांचा संघ या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार असल्याची पुष्टी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या (Cricket South Africa) सूत्रांनी केली आहे. “कोविड टेस्ट घेण्यात आल्या आहेत, टीम केव्हाही रवाना होण्यासाठी तयार आहे,” अशी माहिती सूत्रांनी दिली.

दोन्ही संघांना सहा क्वारंटाइन राहावे लागेल, म्हणजेच मालिकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी त्यांना एक आठवडा प्रशिक्षणासाठी मिळेल. दक्षिण आफ्रिका नुकताच खेळला होता परंतु कोविड-19 महामारीमुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यात टी-20 वर्ल्ड कप फायनलनंतर महिला टीम इंडिया एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळली नाही. गेल्या वर्षी मेलबर्नमधील अंतिम सामन्यानंतर नोव्हेंबर महिन्यात शारजाह येथे महिला टी-20 चॅलेंज दरम्यान भारतीय महिला टीम मैदानावर परतली होती. भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघातील ही मालिका बायो-बबलमध्ये खेळली जाणार असल्याने संघाने पहिल्या सामन्याच्या किमान दोन आठवड्यांपूर्वी एकत्रित होणे आवश्यक असून सहा दिवस क्वारंटाइनसाठी राखून ठेवले आहेत. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "सामन्यासाठी तयारी करणे भारतीय खेळाडूंसाठी एक आव्हान असेल पण, ही मालिका अखेरीस घडत असलेली सर्वात महत्त्वाची बाब. खेळाडूंना याची खूप गरज होती."

यापूर्वी ही मालिका तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफील्ड स्पोर्ट्स हब स्टेडियमवर आयोजित केली जाण्याची शक्यता होती. पण, स्टेडियमच्या मालकांनी त्याच तारखेला सैन्य भरती मोहीम बुक केल्या कारणाने केरळ क्रिकेट असोसिएशनने (केसीए) सामन्यांचे आयोजन करण्यास असमर्थता दर्शवली.