IND-W vs NZ-W: 18 वर्षीय रिचा घोष हीचा मोठा पराक्रम, WODI क्रिकेटमध्ये ठोकले सर्वात वेगवान अर्धशतक; पण चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने मारली बाजी

मालिकेचा चौथा सामना क्वीन्सलँडमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाची यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोष हिने महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.

रिचा घोष (Photo Credit: Twitter/BCCIWomen)

न्यूझीलंड दौऱ्यावर (New Zealand Tour) भारतीय महिला क्रिकेट आणि व्हाईट फर्न्स यांच्यात 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. मालिकेचा चौथा सामना क्वीन्सलँडमध्ये (Queensland) खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाची यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोष (Richa Ghosh) हिने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रिचा घोषने भारतीय महिला संघासाठी एक प्रकारे इतिहास रचला आहे. महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी (Indian Team) सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम आता रिचा घोष हिच्या नावे झाला आहे. घोषने न्यूझीलंड संघाविरुद्ध 192 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. घोषने अवघ्या 26 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह सर्वात वेगवान अर्धशतकी पल्ला गाठला. मात्र, ती जास्त वेळ क्रीझवर राहू शकली नाही आणि 29 चेंडूत 52 धावा करून बाद झाली.

एका क्षणी असे वाटत होते की रिचा घोष पाच सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघात पुनरागमन करून देईल, परंतु ती बाद झाल्याने भारताच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. सामन्याबद्दल बोलायचे तर पावसाने बाधित चौथ्या सामन्याचा खेळ दोन्ही संघासाठी 20-20 षटकांचा करण्यात आला. सामन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत न्यूझीलंड महिला संघाने 20 षटकात 5 गडी गमावून 191 धावांचा डोंगर उभारला. व्हाईट फर्न्सकडून अमेलिया केरने 33 चेंडूत 68 धावा ठोकल्या, तर सुझी बेट्सने 26 चेंडूत 41 धावा केल्या. सोफी डिव्हाईन आणि एमी सथार्थवेट यांनी प्रत्येकी 32 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात टीम इंडिया 17.5 षटकांत 128 धावांत गारद झाली आणि दौऱ्यावर सलग चौथा एकदिवसीय सामना गमावला.

व्हाईट फर्न्स विरोधात आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात स्मृती मंधाना परतली होती. पण विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना ती पहिल्या परीक्षेत अपयशी ठरली आणि 13 धावाच करू शकली. याशिवाय शेफाली वर्मा शून्यावर माघारी परतली. भारताने गेल्या 12 महिन्यांत मायदेशात दक्षिण आफ्रिकेकडून आणि इंग्लंड व ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या पराभवानंतर आणखी एक मर्यादित षटकांच्या मालिका गमावली आहे.