IND vs WI Series 2022: ईडन गार्डन्स मैदानात T20 मालिकेसाठी प्रेक्षकांना मिळणार का एन्ट्री, पश्चिम बंगाल सरकारने घेतला मोठा निर्णय
पश्चिम बंगाल सरकारने सांगितले की सर्व इनडोअर आणि आउटडोअर क्रीडा उपक्रम 75 टक्के क्षमतेसह कार्यक्रमस्थळी आयोजित केले जाऊ शकतात. ईडन गार्डन्सवर आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांच्या ठिकाणी सुमारे 50,000 चाहत्यांची उपस्थितीत अपेक्षित आहे.
IND vs WI Series 2022: वेस्ट इंडिज (West Indies) संघाचा पाहुणचार करण्यासाठी रोहित शर्माची टीम इंडिया (Team India) अहमदाबाद येथे पोहोचली आहे. 6 फेब्रुवारीपासून मर्यादित षटकांची द्विपक्षीय मालिका खेळली जाणार आहे. यामध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका 16 फेब्रुवारीपासून कोलकाताच्या प्रसिद्ध ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानात खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. दरम्यानच्या 3 सामन्यांच्या T20I मालिकेदरम्यान ईडन गार्डन्सला त्याच्या क्षमतेच्या 75 टक्के चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारने सांगितले की सर्व इनडोअर आणि आउटडोअर क्रीडा उपक्रम 75 टक्के प्रेक्षकांच्या क्षमतेसह आयोजित केले जाऊ शकतात. (IND vs WI T20I 2022: भारताविरुद्ध असा आहे वेस्ट इंडिजचा टी-20 संघ, रोहितच्या ‘हिटमॅन’ आर्मीला देणार काट्याची टक्कर)
“सर्व इनडोअर आणि आउटडोअर क्रीडा क्रियाकलापांना स्थळाच्या क्षमतेच्या 75 टक्के परवानगी दिली जाईल,” पश्चिम बंगाल सरकारने सोमवारी सांगितले. ईडन गार्डन्सवर आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांच्या ठिकाणी सुमारे 50,000 चाहत्यांची उपस्थितीत अपेक्षित आहे. या मैदानात रोहित शर्माच्या नेतृत्वात पूर्ण ताकदीचा भारतीय संघ किरोन पोलार्डच्या विंडीज संघाला झटपट क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये आव्हान देईल. उल्लेखनीय म्हणजे, कोलकाता येथे गेल्या वर्षी न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यातील तिसरा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना आयोजित केला होता, ज्यामध्ये ईडन गार्डन्स 50 टक्के क्षमतेने कार्यरत होते.
मूळ वेळापत्रकानुसार वेस्ट इंडिज आणि भारत यांना अहमदाबाद, जयपूर आणि कोलकाता येथे तीन एकदिवसीय सामने आणि कटक, विशाखापट्टणम आणि तिरुअनंतपुरम येथे तीन टी-20 सामने खेळायचे होते. तथापि, गेल्या महिन्यात देशभरात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे बीसीसीआयने अहमदाबाद आणि कोलकाता या दोन ठिकाणी व्हाईट-बॉल मालिका आयोजित करण्याचा निर्णय घेतला. भारताचे नेतृत्व रोहितकडे असेल तर दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिकेत नेतृत्व करणारा केएल राहुल उपकर्णधार असेल. माजी कर्णधार विराट कोहली हा देखील या संघाचा एक भाग आहे ज्यात युवा आणि अनुभव यांचे सुरेख मिश्रण आहे. उल्लेखनीय म्हणजे, एकदिवसीय मालिकेसाठी रोहित आणि संघ सोमवारी संध्याकाळी अहमदाबादला पोहोचले.