IND vs WI 3rd ODI: रोहित ब्रिगेडकडून वेस्ट इंडिजचा ‘सफाया’, प्रथमच विंडीजचा क्लीन स्वीप करून 3-0 ने मालिका काबीज केली
विंडीजची निराशाजनक फलंदाजी सुरूच राहिली आणि संघ 37.1 षटकात फक्त 169 धावाच करू शकले. परिणामी भारताने 96 धावांनी जोरदार विजय मिळवला आणि प्रथमच वनडे मालिकेत वेस्ट इंडिजचा क्लीन-स्वीप केला.
IND vs WI 3rd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) अहमदाबाद येथे झालेल्या एकदिवसीय मालिकेच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात यजमान टीम इंडियाने (Team India) पुन्हा एकदा आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर दणदणीत विजय मिळवला आहे. पहिले फलंदाजी करून रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील भारतीय फक्त 265 धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात विंडीजची निराशाजनक फलंदाजी सुरूच राहिली आणि संघ 37.1 षटकात फक्त 169 धावाच करू शकले. परिणामी भारताने 96 धावांनी जोरदार विजय मिळवला आणि प्रथमच वनडे मालिकेत वेस्ट इंडिजचा क्लीन-स्वीप केला. टीम इंडिया (Team India) आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ही 21 वी द्विपक्षीय वनडे मालिका आहे. यापूर्वी खेळल्या गेलेल्या 20 एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजने टीम इंडियाला दोनदा ‘क्लीनस्वीप’ केला आहे. (IND vs WI 3rd ODI: ‘हिटमॅन’ आर्मीचा विंडीजवर ऐतिहासिक विजय, रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह खेळाडूंनी तिसऱ्या वनडे सामन्यात केले हे प्रमुख रेकॉर्ड)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील आजच्या तिसऱ्या वनडे सामन्याबद्दल बोलायचे तर पाहुण्या संघासाठी प्रभारी कर्णधार निकोलस पूरनने 34 धावा केल्या. तर ओडियन स्मिथ 36 धावांची झुंजार खेळी केली. याशिवाय अन्य धुरंधर फलंदाज 20 धावसंख्या देखील पार करू शकले नाही. दुसरीकडे, भारतासाठी मालिकेत पहिलाच सामना खेळणारा कुलदीप यादव संघासाठी महागडा ठरला. कुलदीपने आपल्या 8 ओव्हरमध्ये 51 धावा लुटल्या आणि 2 विकेट घेतल्या. याशिवाय प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर दीपक चाहरने 2 गडी बाद केले. यापूर्वी सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. पण संघाला सुरुवात मिळाली नाही आणि फक्त 42 धावसंख्येवर रोहितसह विराट कोहली आणि शिखर धवन देखील स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतले. तथापि श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतने फलंदाजीची धुरा हाती घेऊन जबाबदारीने विंडीज गोलंदाजांचा सामना केला.
श्रेयस आणि पंतने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. दीडशे धावसंख्या ओलांडल्यावर भारताने पंत, सूर्यकुमार यादव आणि श्रेयसच्या विकेट झटपट गमावल्या. पण अंतिम टप्प्यात दीपक चाहर आणि वॉशिंग्टन सुंदरने फटकेबाजी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. अय्यरने सर्वाधिक 80 धावा ठोकल्या. तर पंतने 56, दीपक चाहरने 38 आणि सुंदरने 33 धावांचे मोलाचे योगदान दिले. तसेच विंडीजसाठी जेसन होल्डरने 4 विकेट घेतल्या. आता दोन्ही संघा 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान तीन सामन्यांची टी-20 मालिकेत कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर आमनेसामने येतील.