IND vs WI 3rd ODI: ‘हिटमॅन’ आर्मीचा विंडीजवर ऐतिहासिक विजय, रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह खेळाडूंनी तिसऱ्या वनडे सामन्यात केले हे प्रमुख रेकॉर्ड

तिसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 96 धावांनी पराभव केला. विंडीज खेळाडूंची बॅटने निराशाजनक कामगिरी सुरूच राहिली. या सामन्यात काही महत्वपूर्ण रेकॉर्ड देखील बनले जे खालीलप्रमाणे आहेत.

भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs WI 3rd ODI: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना आज अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. तिसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 96 धावांनी पराभव केला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी निर्धारीत 50 संघात सर्वबाद 265 धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात विंडीज संघ 37.1 षटकांत सर्व गडी गमावून 169 धावाच करू शकला. भारताचा आघाडीचा फलंदाजी क्रम पुन्हा एकदा गडगडला तर विंडीज खेळाडूंची बॅटने निराशाजनक कामगिरी सुरूच राहिली. या सामन्यात काही महत्वपूर्ण रेकॉर्ड देखील बनले जे खालीलप्रमाणे आहेत. (IND vs WI 3rd ODI: रोहित ब्रिगेडकडून वेस्ट इंडिजचा ‘सफाया’, प्रथमच विंडीजचा क्लीन स्वीप करून 3-0 ने मालिका काबीज केली)

1. वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने 111 चेंडूत 9 चौकारांसह 80 धावांची शानदार खेळी केली. या अर्धशतकी खेळीसह अय्यरने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या 24व्या डावात अय्यरने 50 पेक्षा अधिक धावा करण्याची ही 10 वी वेळ आहे. कोहलीने देखील इतक्याच डावात 10 वेळा 50 हून अधिक धावा केल्या होत्या.

2. वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा व शिखर धवन च्या त्रिकुटाने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारतीय संघाचे हे त्रिकुट 109 व्या एकदिवसीय सामन्यात एकत्र खेळत आहे आणि यादरम्यान विराट, रोहित व धवन यांना 20 पेक्षा जास्त धावा करता आल्या नसल्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2013 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोहली, रोहित आणि धवन यांनी 20 पेक्षा कमी धावा केल्या होत्या.

3. रोहित शर्माच्या नेतृत्वात एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाने आपल्या जबरदस्त गोलंदाजीच्या वेस्ट इंडिजचा तीन सामन्यांच्या मालिकेत ऐतिहासिक क्लीन स्वीप केला. कारण विंडीज संघावरील टीम इंडियाचा हा पहिलावाहिला व्हाईट-वॉश आहे.

4. वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय वनडे मालिकेत विराट कोहलीने केवळ 26 धावा केल्या आहेत. विराट वनडेत 15व्यांदा खाते न उघडताच बाद झाला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद झालेल्या भारतीय फलंदाजांच्या यादीत कोहली आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

5. विराट कोहली क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट होण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या प्रकरणात त्याने माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला मागे टाकले आहे. कोहली आता क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 32 वेळा खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला आहे, तर सेहवागच्या नावावर 31 वेळा असे करण्याचा विक्रम होता.