IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत क्रिस गेल याने रचला इतिहास; सचिन तेंडुलकर याला टाकले पिछाडीवर, वाचा सविस्तर
गेलने जेव्हा वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे, तेव्हापासून त्याने सलामीला फलंदाजी करत 10107 धावा केल्या आहेत. याच बरोबर त्याने मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकरला पिछाडीवर टाकले आहेत. सलामीवीर म्हणून तेंडुलकरने 9261 धावा केल्या आहेत.
भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यातील तिसरा वनडे सामना विंडीज क्रिकेटपटू क्रिस गेल (Chris Gayle) याचा कारकीर्दीचा शेवटचा सामना आहे. विश्वचषकच्या 12 व्या आवृत्ती दरम्यान गेलने आपण भारत विरुद्ध मालिका खेळल्यानंतर निवृत्त होत असल्याचे म्हटले होते. गेल भारतविरुद्ध टेस्ट मालिकेनंतर निवृत्त होणार होता. पण, विंडीज क्रिकेट बोर्डाने जेव्हा भारत विरुद्ध टेस्ट संघ जाहीर केला तेव्हा गेलला त्यामध्ये स्थान मिळालं नाही. अश्या परिस्थितीत आजचा सामना गेलचा हा अखेरचा वनडे सामना असल्याचे मानले जात आहे. आजच्या मॅचमध्ये विंडीज कर्णधार जेसन होल्डर याने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (IND vs WI 3rd ODI: क्रिस गेल याचा अखेरचा सामना, आऊट झाल्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंनी खास शैलीत केले अभिवादन)
या सामन्यात सलामीला आलेल्या गेल आणि एव्हिन लुईस (Evin Lewis) यांनी शतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. आपल्या करिअरच्या शेवटच्या खेळीत गेलने 41 चेंडूत 72 धावांची खेळी केली. गेलने आपल्या अर्धशतकीय खेळीत 8 चौकार आणि 5 षटकार मारले. गेलने जेव्हा वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे, तेव्हापासून त्याने सलामीला फलंदाजी करत 10107 धावा केल्या आहेत. याच बरोबर त्याने मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला पिछाडीवर टाकले आहेत. सलामीवीर म्हणून तेंडुलकरने 9261 धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) आहे. शिवाय, सलामीला येऊन दहा हजार धावा करण्याचा मान फक्त गेलला मिळाला आहे.
दरम्यान, गेलने अजून त्याच्या निवृत्तीबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. पण या सामन्यात बाद झाल्यानंतर गेलचा फोटो पाहिला तर त्यामधून त्याच्या निवृत्तीचे संकेत मिळत असल्याचे चाहते म्हणत आहेत. बाद झाल्यावर गेलने हेल्मेट काढले आणि आपल्या बॅटवर ठेवले. गेलचे हे असे वागणे नेमके काय दर्शवते, याचा अंदाज क्रिकेट चाहते बांधत आहे.