IND vs SL Test 2022: श्रीलंकेला टी-20 मालिकेत एकहाती धूळ चारलेला धाकड भारतीय फलंदाज आता कसोटीत देखील करणार कहर, दिग्गज खेळाडूची घेणार जागा
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वांचे लक्ष्य आतापर्यंत फक्त दोन टेस्ट मॅच खेळलेल्या मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर याच्यावर असेल. अय्यरने गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध सामन्यातून आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण केले.
IND vs SL Test 2022: श्रीलंका (Sri Lanka) संघाविरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-0 अशा क्लीन स्वीपनंतर रोहित शर्माच्या टीम इंडियाचे (Team India) लक्ष्य आता कसोटी मालिका काबीज करण्यावर असेल. 4 मार्चपासून दोन्ही संघात कसोटी मालिकेचा रोमांच रंगणार आहे आणि भारतीय संघ टी-20 सिरीजनंतर क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये देखील दबदबा कायम ठेवण्यासाठी उत्सुक असेल. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वांचे लक्ष्य आतापर्यंत फक्त दोन टेस्ट मॅच खेळलेल्या मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्यावर असेल. अय्यरने गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध सामन्यातून आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण केले. श्रेयसने यादरम्यान एक शतक आणि एकदा अर्धशतकी खेळी करून टेस्ट चॅम्पियन संघाला घाम फोडला होता. त्यांनतर दक्षिण आफ्रिका कसोटीसाठी निवड झाली, पण चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे या दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीमुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.
श्रेयसने नुकत्याच संपुष्टात आलेल्या श्रीलंका टी-20 मालिकेत तिन्ही सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी करून पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अय्यरने तीन सामन्यांच्या मालिकेत अनुक्रमे 57, 74 आणि 73 धावांची अर्धशतकी खेळी केली. विराट कोहली, रिषभ पंत आणि सूर्यकुमार यादव मालिकेतून बाहेर बसल्यामुळे अय्यरवर मधल्या फळीत धावा करण्याची मोठी संधी होती. आणि मुंबईकर फलंदाजाने स्वतःवर दडपण येऊ न देता श्रीलंकन गोलंदाजांवर हल्ला चढवला. याशिवाय मायदेशात होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेसाठी दिग्गज पुजारा आणि रहाणे यांना वगळण्यात आले असल्यामुळे अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये एक मोठ्या खेळाडूची कमतरता बहरून काढायची असेल. अय्यरला फलंदाजी क्रमवारीत विराटच्या पुढे आणि पुजाराच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा संधी दिली जाऊ शकते.
पुजारा आणि रहाणे यांच्यासारखे कसोटी दिग्गज संघात नसल्यामुळे श्रेयस याच्यासह अन्य युवा खेळाडूंवर त्यांची उणीव भासू न देण्याची मोठी जबाबदारी असेल. अय्यर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध तो मधल्या फळीत निर्णायक भूमिका बजावेल असे अपेक्षित आहे. अय्यरने लंकन संघाविरुद्ध झटपट क्रिकेट फॉरमॅटमध्ये बॅटने जबरदस्त खेळ केला आणि संघाला फलंदाजीने एकहाती विजय मिळवून दिला. दुसरीकडे, आगामी कसोटी मालिकेसाठी कोहली आणि पंत देखील संघात परतणार आहेत. दोघांनी विंडीजविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यासाठी श्रीलंकाविरुद्ध टी-20 मालिकेसाठी आराम देण्यात आला होता. अशा परिस्थितीत दोन्ही खेळाडूंच्या परतण्याच्या आणि श्रेयसचा फॉर्म श्रीलंका संघावर नक्कीच भारी पडेल.