IND vs SA T20I: 15 सप्टेंबरपासून होणार भारत-दक्षिण आफ्रिका संघात लढत, कोण कोणाच्या वरचढ, पहा हे आकडे

टी-20 मधील एकूण रेकॉर्ड पाहता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेवर वरचढ आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध दौऱ्यात उत्तम फलंदाजी केली होती. पण, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध विजय मिळवणे त्यांना कठीण जाईल असे दिसत आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ (Photo Credit: Getty)

15 सप्टेंबरपासून भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघात टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. आतापर्यंत टी-20 मालिकेत दोन्ही संघ 14 वेळा एकमेकांविरूद्ध आले आहेत. त्यापैकी भारताने आठ आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाच सामने जिंकले आहेत तर एका सामना अनिर्णित राहिला. 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या वँडरर्स स्टेडियमवर झालेल्या टी-20 सामन्यात दोन्ही संघ पहिल्यांदाच भिडले होते. विश्वचषकमधील दुःखद पराभवानंतर दक्षिण आफ्रिका संघात मोठा बदल करण्यात आला आहे. क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याला कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे डी कॉक कर्णधार म्हणून पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर उत्तम परिणामाची नोंद करण्याचा प्रयत्न करेल. (IND vs SA 1st T20I: धर्मशाला टी-20 मॅचवर पावसाचे संकट? जाणून घ्या काय आहे हवामान खात्याचा अंदाज)

दुसरीकडे, टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध दौऱ्यात उत्तम फलंदाजी केली होती. पण, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध विजय मिळवणे त्यांना कठीण जाईल असे दिसत आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टीम इंडियाच्या चिंतेचे कारण म्हणजे घरच्या मैदानातील त्यांचा रेकॉर्ड. मायदेशातील आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला कधीही पराभूत केले नाही. शिवाय, दक्षिण आफ्रिका हा एकमेव असा संघ आहे ज्यांच्याविरुद्ध टीम इंडियाने घरच्या टी-20 मॅचेस जिंकू शकली नाही. 2015 मध्ये भारतात दक्षिण आफ्रिकेने अंतिम टी-20 सामना केलेला होता ज्यात त्यांनी 2-0 असा विजय मिळवला होता. भारतात दक्षिण आफ्रिकेने 6 सामन्यांत 4 सामन्यात 66.67% टक्के विजय मिळविला आहे.

पण, टी-20 मधील एकूण रेकॉर्ड पाहता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेवर वरचढ आहे. आफ्रिकाविरुद्धच्या 13 सामन्यात टीम इंडियाने 8 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. रोहित शर्मा याने दोन्ही संघांदरम्यान खेळलेल्या टी-20 सामन्यात सर्वाधिक 341 धावा केल्या आहेत. 2015 मध्ये धर्मशाला मैदानावर रोहितने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सर्वाधिक 106 धावा केल्या होत्या. तर, आर अश्विन याने सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या आहेत. पण, यंदाच्या मालिकेसाठी अश्विनला भारतीय संघात स्थान मिळाले नाही.  रविवार पासून सुरु होणाऱ्या टी-20 मालिकेत विजय मिळवत टीम इंडियाला विक्रम करण्याची संधी आहे. आजवर खेळण्यात आलेल्या आफ्रिकासंघाविरुद्ध घरच्या मैदानावर एकदाही भारताने विजय मिळवाल नाही. त्यामुळे विराटचा संघ सध्या हा रेकॉर्ड मोडण्याच्या प्रयत्नात असेल, पण दक्षिण आफ्रिका संघ देखील त्यांचा विश्वचषकमधील खेळ मागे टाकत नवीन सुरुवात करू इच्छित असेल.