IND vs SA Series 2022: कर्णधार KL Rahul पुढे मोठे आव्हान, दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडिया मोडणार टी-20 विश्वविक्रम?
दक्षिण आफ्रिका संघ टी-20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार असून यासाठी भारतीय दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थिती केएल राहुलच्या खांद्यावर भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरु ठेवण्याचे आव्हान असणार आहे.
IND vs SA Series 2022: इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 15 वा सीझन दणक्यात संपुष्टात आला आहे. गुजरात टायटन्सने पदार्पणात जेतेपद जिंकून स्पर्धेची सांगता केली. यासह आता जून महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा थरार सुरु होणार आहे. याची सुरुवात दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याने (South Africa Tour of India) होणार आहे. 9 जूनपासून भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. मालिकेदरम्यान कर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. मायदेशात Proteas संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहसह अनेकांना आराम दिला गेला आहे, तर काही धुरंधर दुखापतीमुळे बाहेर बसणार आहेत. नियमित कर्णधार रोहितच्या अनुपस्थितीत राहुलकडे संघाची कमान देण्यात आली आहे. (IND vs SA Series 2022: ‘या’ 5 भारतीय खेळाडूंना संपूर्ण मालिकेत कदाचितच मिळेल संधी, बेंचवर बसून घ्यावा लागेल सिरीजचा आनंद)
तथापि फक्त कर्णधार म्हणून ही त्याची सर्वात मोठी कसोटीच नसून सर्वाधिक सलग टी-20 जिंकण्याचा विश्वविक्रमही टीम इंडियाच्या नावावर होण्याची राहुलला खात्री करावी लागेल. 9 जून रोजी दिल्लीतील पहिल्या टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यास, भारत सलग सर्वाधिक टी-20 जिंकण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित करेल. टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध भारताची विजयी वाटचाल सुरू झाली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2-0 अशी आघाडी घेतल्यानंतर, रोहित शर्माने विजयी मालिका सुरू ठेवली. ‘हिटमॅन’च्या नेतृत्वाखाली भारताने अनुक्रमे न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेला टी-20 मालिकेत धूळ चारली आणि 12-0 विजयी घोडदौड सुरु ठेवली. अशा परिस्थतीत आता विजय गती सुरु ठेवण्याची जबाबदारी केएल राहुलवर आहे. भारताने आतापर्यंत 12 सलग टी-20 सामने जिंकले असून ते सध्या अफगाणिस्तान आणि रोमेनियाच्या बरोबरीवर आहेत. त्यामुळे, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिला टी-20 जिंकून भारत एक नवीन जागतिक रेकॉर्ड नोंदवू शकतो.
दरम्यान, हे सर्व इतके सोप्पे होणार नाही. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीशिवाय टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेने दोन महिने आयपीएल 2022 खेळलेल्या भारतीय परिस्थितीची जाणीव असलेल्या बहुतेक खेळाडूंसह एक मजबूत संघ पाठवला आहे. राहुल द्रविड आणि बीसीसीआयला पूर्ण ताकदीचा संघ हवा होता याचे विश्वविक्रम हे एक कारण होते. पण दुखापती, निगल्स, थकवा आणि खराब फॉर्ममुळे बीसीसीआयने कर्णधार वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेऐवजी वरील खेळाडू 16 जून रोजी इंग्लंडला रवाना होतील.