IND vs SA 2nd Test Day 4: जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेने रोखला टीम इंडियाचा विजयरथ; Wanderers वर भारताचा 7 गडी राखून पराभव, मालिका 1-1 ने बरोबरीत

वांडरर्स स्टेडियम हा भारतीय संघाचा 'किल्ला' मानला जात होता कारण गेल्या 26 वर्षांत टीम इंडियाने येथे एकही कसोटी सामना गमावलेला नव्हता. मात्र डीन एल्गरच्या Proteas संघाने सात गडी राखून भारतीय संघाला पराभवाची धूळ चारली आणि तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

डीन एल्गार (Photo Credit: Twitter/OfficialCSA)

IND vs SA 2nd Test Day 4: जोहान्सबर्गच्या (Johannesburg) द वांडरर्स स्टेडियमवरील टीम इंडियाचा (Team India) विजयरथ यजमान दक्षिण आफ्रिकेने (South Africa) रोखला आहे. वांडरर्स स्टेडियम (Wanderers Stadium) हा भारतीय संघाचा 'किल्ला' मानला जात होता कारण गेल्या 26 वर्षांत टीम इंडियाने येथे एकही कसोटी सामना गमावलेला नव्हता. मात्र डीन एल्गरच्या  (Dean Elgar) Proteas संघाने सात गडी राखून भारतीय संघाला (Indian Team) पराभवाची धूळ चारली आणि तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. एल्गरने पुढाकाराने नेतृत्वात करून संघाला विजयीरेष ओलांडून दिली. तो 96 धावा करून अखेरीस नाबाद परतला. याशिवाय रॅसी व्हॅन डर डुसेनने 40 आणि टेंबा बावुमा 23 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, भारतासाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि आर अश्विनने प्रत्येकी 1 विकेट घेतली, पण एल्गरच्या चिवट फलंदाजीपुढे भारतीय गोलंदाज फ्लॉप ठरले. (IND vs SA 2nd Test: ‘राहुल द्रविडने नक्कीच बांबू लावला असेल’, दक्षिण आफ्रिकेला विकेट भेट दिलेल्या स्टार भारतीय खेळाडूला सुनील गावस्करने सुनावले)

सामन्याबद्दल बोलायचे तर प्रभारी कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वात भारताने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. राहुलने अर्धशतक झळकावले तर अश्विनने 46 धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय पहिल्या डावात अन्य भारतीय फलंदाज प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेसाठी कीगन पीटरसन आणि बावुमाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 229 धावांपर्यंत मजल मारली आणि पाहुण्या संघावर 27 धावांची नाममात्र आघाडी घेतली. पीटरसनने सर्वाधिक 62 धावा केल्या तर बावुमाने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. भारतासाठी पहिल्या डावात शार्दूल ठाकूरने 7 विकेट घेतल्या. यानंतर दुसऱ्या डावात भारताच्या फ्लॉप फलंदाजीचे सत्र सुरूच राहिले. राहुल आणि मयंक अग्रवालची सलामी जोडी स्वस्तात बाद झाली. अशा परिस्थितीत टीकेला सामोरे जाणारी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेची जोडी पुढे सरसावली. दोघांनी शतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरला. यादरम्यान पुजारा-रहाणेने अर्धशतकी पल्ला गाठला पण मोठी खेळी करू शकले नाही. अश्विन आणि शार्दूल ठाकूरही बॅटने फारसे प्रभावित करू शकले नाही. आणि भारताचा डाव 266 धावांत आटोपला.

तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेसाठी एल्गरने सलामीवीर एडन मार्करमसह संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. मार्करम चांगल्या लयीत दिसत होता, पण ठाकूरने 47 धावसंख्येवर त्याला बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. पीटरसनला अश्विनने 28 धावांवर पायचीत केलं. पण व्हॅन डर डुसेनसह एल्गरने 82 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या नजीक पोहोचवले. शमीने डुसेनला मोक्याच्या क्षणी माघारी धाडलं. पण एल्गर आणि बावुमाने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. भारताचा या मैदानावर खेळलेल्या सहा सामन्यांपैकी पहिला पराभव ठरला आहे.