IPL Auction 2025 Live

IND vs SA 2nd ODI: विराट कोहली, रिषभ पंतची विक्रमी खेळी; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या वनडे सामन्यात बनले हे प्रमुख रेकॉर्ड

भारतीय कर्णधार राहुलने टॉस जिंकला असला तरी संघ सामना जिंकू शकला नाही. दोन्ही संघातील या सामन्यात काही प्रमुख रेकॉर्डही बनले जे खालीलप्रमाणे आहेत.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd ODI Stats: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील पार्लच्या बोलंड पार्क (Boland Park) येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात पाहुण्या टीम इंडियाला (Team India) 7 विकेट आणि 11 चेंडू शिल्लक असताना लज्जास्पद पराभव पत्करावा लागला आहे. भारतासाठी केएल राहुल (KL Rahul) आणि रिषभ पंतने (Rishabh Pant) अर्धशतकी खेळी केली तर गोलंदाजांच्या निराशनजक कामगिरीमुळे भारतीय संघाने सामन्यासह मालिका हातून गमावली. भारतासाठी शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक विकेट घेतली. रसी वॅन डर डुसेन आणि एडन मार्करमच्या अर्धशतकी भागीदारीने संघाला विजयीरेष ओलांडून दिली. दुसरीकडे, भारतीय कर्णधार राहुलने टॉस जिंकला असला तरी संघ सामना जिंकू शकला नाही. दोन्ही संघातील या सामन्यात काही प्रमुख रेकॉर्डही बनले जे खालीलप्रमाणे आहेत. (IND vs SA 2nd ODI: सामन्यासह KL Rahul आणि ब्रिगेडने मालिका गमावली, भारतीय गोलंदाजांचा ‘फ्लॉप शो’ सुरूच; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत 2-0 अजेय आघाडी)

1. रिषभ पंतने दक्षिण आफ्रिकेत भारतीय यष्टीरक्षक-फलंदाजाने वनडेतील सर्वोच्च धावसंख्येत प्रशिक्षक राहुल द्रविडचा विक्रम मागे टाकला. पंतने 71 चेंडूत 85 धावा केल्या. तर 2001 मध्ये डरबन येथील द्रविडच्या 77 धावा ही भारतीय यष्टीरक्षकाची यापूर्वीची सर्वोच्च धावसंख्या होती.

2. पार्ल येथील बोलंड पार्क येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात माजी भारतीय कर्णधार विराट कोहली केवळ 5 चेंडूंचा सामना करून शून्यावर बाद झाला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट शून्यावर बाद होण्याची ही 14वी वेळ होती आणि वनडेमध्ये स्पिनरने माजी कर्णधाराला शून्यावर बाद करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

3. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शून्यावर माघारी परतताच विराट कोहलीने माजी कर्णधार आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक, राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शून्य धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या अवांछित यादीत मागे टाकले. सचिन तेंडुलकर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 20 वेळा ‘गोल्डन डक’वर आऊट झाला आहे.

4. शुक्रवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुल पुन्हा लयीत परतला आणि त्याने शानदार अर्धशतकी खेळी खेळली आणि विक्रमांच्या यादीत आपले नाव लिहिले. राहुलने परदेशी भूमीवर 1000 वनडे धावा पूर्ण केल्या आहेत. राहुलच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल बोलायचे तर त्याने आतापर्यंत 40 सामन्यांमध्ये 1576 धावा केल्या आहेत ज्यात परदेशी भूमीवर 1000 पेक्षा धावांची नोंद आहे.

5. पार्लच्या बोलंड पार्क येथे झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या वनडेत विराट कोहलीला शून्यावर बाद करून केशव महाराजने ऐतिहासिक कामगिरी बजावली. माजी भारतीय कर्णधारला शून्यावर बाद करणारा महाराज पहिला फिरकीपटू ठरला आहे. यापूर्वी पहिल्या 13 प्रसंगी तो वेगवान गोलंदाजाच्या चेंडूवर भोपळा न फोडता बाद झाला.