IND vs PAK Series: भारतासोबत क्रिकेट खेळण्याचा विचारात PCB अध्यक्ष रमीज राजा, जाणून घ्या कशाची करताहेत तयारी
भारत आणि पाकिस्तान 2013 पासून आयसीसी किंवा आशिया चषक स्पर्धेबाहेर द्विपक्षीय मालिका खेळलेले नाही.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) अध्यक्ष रमीज राजा (Ramiz Raja) यांनी म्हटले आहे की ते भारत (India), पाकिस्तान (Pakistan), इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असलेल्या चार देशांच्या आंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) ठेवणार आहेत. राजा म्हणाले की, मालिका पुढे गेल्यास नफा सर्व आयसीसी सदस्यांमध्ये वाटून घेतला जाईल. “नमस्कार चाहत्यांनो. आयसीसीला चार राष्ट्रांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सुपर सीरिजचा प्रस्ताव ठेवू ज्यामध्ये पाकिस्तान, भारत, ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंडचा (England) समावेश असेल, आयसीसीच्या सर्व सदस्यांसह टक्केवारीच्या आधारावर नफ्यासह एक वेगळे महसूल मॉडेल शेअर केले जाईल, असे वाटते की आमच्याकडे विजेता आहे,” राजा म्हणाले. भारत आणि पाकिस्तान 2013 पासून आयसीसी किंवा आशिया चषक स्पर्धेबाहेरील सामन्यांमध्ये आमनेसामने आलेले नाहीत.
दोन्ही संघात 2012/13 आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका खेळली गेली ज्यामध्ये भारताने पाकिस्तानचा पाहुणचार केला होता. ही देखील दोन्ही संघांमधील खेळली गेलेली शेवटची द्विपक्षीय मालिका होती आणि 2008 पासून दोघे एकाही कसोटी मालिकेत एकमेकांसमोर आले नाही. दरम्यान दोन्ही संघ नुकतेच टी-20 विश्वचषक स्पर्धेत एकमेकांसमोर आले होते, जिथे पाकिस्तानने विश्वचषक स्पर्धेत भारतावर पहिला विजय नोंदवला होता. सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला आणि उपांत्य फेरीत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊन स्पर्धे बाहेर पडला. सुपर 12 टप्पा अपराजित राहिलेला पाकिस्तान हा एकमेव संघ असताना, भारताला गट टप्प्यातून पुढे जाण्यात अपयश असून त्यांच्या दुसऱ्या गट सामन्यात न्यूझीलंडकडून सात गडी राखून पराभव पत्करावा लागला.
T20 विश्वचषक 2021 स्पर्धेत पाकिस्तानने भारताविरुद्ध पराभवाचा सिलसिला तोडला. यापूर्वी कोणत्याही विश्वचषकात पाकिस्तानला भारताला हरवता आले नव्हते. भारत आणि पाकिस्तान संघ फक्त आयसीसी आणि आशियाई स्पर्धांमध्ये एकमेकांचा सामना करतात हे सर्वांना माहीत आहे. राजकीय तणाव आणि दहशतवादाचा मुद्दा लक्षात घेता दोन्ही देशात कोणत्याही प्रकारचे द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळली जात नाही.