IND vs NZ Test Series 2021: न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात ‘या’ भारतीय गोलंदाजाने घेतल्या 13 विकेट्स, रहाणेच्या टीम इंडियाचा ठरू शकतो ‘ट्रम्प कार्ड’

भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंचे वर्चस्व राहणार असून टीम इंडियाच्या विजयात त्यांचा मोठा वाटा असेल, ज्यामध्ये वरिष्ठ फिरकी गोलंदाज आर अश्विनची भूमिका सर्वात महत्त्वाची असेल. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये किवींविरुद्ध आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात 25 नोव्हेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या कसोटी मालिकेपूर्वी गेल्या पाच मालिकांबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाने (Indian Team) किवीजविरुद्ध मायदेशात एकही मालिका गमावलेली नाही. गेल्या पाच कसोटी मालिकांमध्ये भारतीय संघाने चार जिंकले होते, तर एक अनिर्णित राहिली होती. आता पुन्हा एकदा टीम इंडिया ही विजयरथ कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि त्यासाठी भारतीय फलंदाज व गोलंदाज दोघांनाही सर्वतोपरीने प्रयत्न करावे लागतील. भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंचे वर्चस्व राहणार असून टीम इंडियाच्या (Team India) विजयात त्यांचा मोठा वाटा असेल, ज्यामध्ये वरिष्ठ फिरकी गोलंदाज आर अश्विनची (R Ashwin) भूमिका सर्वात महत्त्वाची असेल. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये किवींविरुद्ध आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे आणि खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये ब्लॅककॅप्सविरुद्ध भारताच्या सध्याच्या संघात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. (IND vs NZ Test 2021 Series: कानपूर कसोटीपूर्वी केएल राहुलची मालिकेतून एक्झिट, ‘या’ स्फोटक फलंदाजाची झाली एन्ट्री)

न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत फिरकीपटू आर अश्विन संघासाठी ‘ट्रम्प कार्ड’ ठरू शकतो. अश्विनने न्यूझीलंडविरुद्धच्या 7 सामन्यांत 52 विकेट घेतले असून भारताकडून सर्वाधिक गडी बाद करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत बिशनसिंग बेदी 57 विकेट्ससह आणि ई प्रसन्ना 55 विकेट्ससह अनुक्रम पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना मागे सोडण्याची अश्विनला चांगली संधी आहे. याशिवाय किवीजविरुद्ध कसोटी सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम आर अश्विनच्या नावावर आहे. 2016 मध्ये इंदूर कसोटी सामन्यात त्याने किवी संघाविरुद्ध दोन्ही डावात एकूण 13 विकेट घेतल्या होत्या. त्या सामन्याच्या दोन्ही डावात त्याने 41.1 षटकात 140 धावा देत 13 विकेट घेतल्या आणि तेव्हापासून हा विक्रम अजूनही अबाधित आहे.

केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघ 33 वर्षांपासून सुरु असलेला इतिहास बदलून भारतात पहिली मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. किवी संघाने गेल्या 33 वर्षांपासून भारतीय मैदानावर एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. 1988 मध्ये त्याने भारतातील शेवटची कसोटी जिंकली होती. मात्र त्यानंतर भारतीय संघाविरुद्ध त्यांना सर्वच दौऱ्यांवर पराभवाला सामोरे जावे लागले होते.