IND vs NZ 2021 Series: रोहित शर्माची कर्णधारपदी निवड, KL Rahul उपकर्णधार; विराट कोहली समवेत चार स्टार खेळाडूंना विश्रांती, पहा संपूर्ण संघ

शर्मा 17 नोव्हेंबरपासून किवी संघाविरुद्ध मायदेशात होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांसाठी 16 सदस्यीय संघाचे नेतृत्व करणार आहेत. त्याचा सलामी जोडीदार केएल राहुलची उपकर्णधार म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

रोहित शर्मा व केएल राहुल (Photo Credit: PTI)

न्यूझीलंडविरुद्ध आगम मालिकेसाठी रोहित शर्माची भारताच्या टी-20 कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. शर्मा 17 नोव्हेंबरपासून किवी संघाविरुद्ध मायदेशात होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांसाठी 16 सदस्यीय संघाचे नेतृत्व करणार आहेत. आयसीसी पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेच्या समाप्तीनंतर भारताच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कर्णधारपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर विराट कोहलीला संघात विश्रांती देण्यात आली आहे. शर्माच्या हाती संघाची धुरा असेल तर त्याचा सलामी जोडीदार केएल राहुलची उपकर्णधार म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तसेच विराटच्या साथीला मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनाही विश्रांती देण्यात आली आहे.

उल्लेखनीय म्हणजे न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत अनेक युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, ज्यांनी आयपीएलमध्ये आपले नाव उज्ज्वल केले आहे. यामध्ये व्यंकटेश अय्यर, आवेश खान, हर्षल पटेल, रुतुराज गायकवाड या नावांचा समावेश आहे. तसेच श्रेयस अय्यर दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे, तर विश्वचषक संघातून वगळण्यात आलेल्या युजवेंद्र चहलचेही पुनरागमन झाले आहे. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा यांना टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. हे तिन्ही खेळाडू असे आहेत जे सतत क्रिकेट खेळत असतात. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील कसोटी सामन्यांनंतर तीनही खेळाडू आयपीएल व त्यानंतर विश्वचषक खेळले आहेत. दुसरीकडे, जर रोहितबद्दल बोलायचे झाले तर तो देखील सतत खेळत आहे पण आता त्याची टी-20 कर्णधार म्हणून नियुक्तीनंतर त्याला विश्रांती देण्यात आली नाही. यासोबतच भारतीय क्रिकेटमध्ये आता एक नवीन अध्याय सुरू झाला आहे.

भारताचा संघ

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

भारत-न्यूझीलंड मालिकेचे वेळापत्रक-

• 17 नोव्हेंबर - पहिली टी-20 (जयपूर)

• 19 नोव्हेंबर - दुसरी टी-20 (रांची)

• 21 नोव्हेंबर - तिसरी टी-20 (कोलकाता)

• पहिली कसोटी 25-29 नोव्हेंबर (कानपूर)

• दुसरी कसोटी 3-7 डिसेंबर (मुंबई)