IND vs NZ 1st Test: कानपूर कसोटीपूर्वी चेतेश्वर पुजाराची मोठी घोषणा, ‘या’ मानसिकतेने उतरणार मैदानात- म्हणाला ‘शतक न करणे चिंतेची बाब नाही’
पुजाराने जानेवारी 2019 पासून एकही शतक झळकावलेले नाही पण या वर्षी इंग्लंडमधील मालिकेत तो शंभरी धावसंख्येचा पल्ला गाठण्याच्या जवळ आला होता.
भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील पहिला कसोटी सामना 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये (Kanpur) सुरू होत आहे. या कसोटी सामन्यापूर्वी उपकर्णधार चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) पत्रकार परिषद घेतली आणि त्यात केलेल्या वक्तव्याने न्यूझीलंडसाठी (New Zealand) धोक्याची घंटा वाजली आहे. पुजाराने आपण लवकरच शतक झळकावणार असल्याचे सांगितले आहे. चेतेश्वर पुजाराने जानेवारी 2019 पासून शतक झळकावलेले नाही पण इंग्लंडविरुद्ध अलीकडच्या मालिकेत तो दुष्काळ तोडण्याच्या जवळ आला आहे. पुजाराने हेडिंग्ले येथे भारताच्या दुसऱ्या डावात 91 धावा केल्या, तो त्याच्या 19व्या कसोटी शतकापासून केवळ नऊ धावांनी ओली रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर आऊट होऊन बाद झाला. (IND vs NZ 1st Test: कानपुर कसोटीत ‘हा’ गोलंदाज टीम इंडियासाठी उघडणार विजयाचे दार, न्यूझीलंड विरोधात ठरू शकतो मॅच-विनर)
“इंग्लंड कसोटी मालिकेत माझी मानसिकता वेगळी होती, मी खूपच निर्भय होतो. तंत्रात फारसा बदल झालेला नाही. न्यूझीलंड मालिकेसाठी आतापर्यंतची तयारी चांगली झाली आहे आणि मी तीच निर्भय मानसिकता किवीजविरुद्ध देखील पुढे नेण्याचा प्रयत्न करेन,” पुजाराने मंगळवारी आभासी पत्रकार परिषदेत सांगितले. याशिवाय शतक न करणे चिंतेची बाब नसल्याचे देखील त्यांनी म्हटले. तो म्हणाला, “मी 50-60 धावांचे योगदान देत आहे. जोपर्यंत मी चांगला खेळतो तोपर्यंत मला काळजी नाही. ते येईलच,” असे तो म्हणाला. पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली बाहेर बसल्याने अजिंक्य रहाणे भारताचा कर्णधार असेल आणि चेतेश्वर पुजारा उपकर्णधार असेल. तो म्हणाला की अतिरिक्त जबाबदारी त्याच्यासाठी चांगली असू शकते परंतु परिस्थिती सामान्यपणे कशी असते त्यापेक्षा खूप वेगळी नसेल. “अतिरिक्त जबाबदारी चांगली असू शकते आणि काहीवेळा तुमच्या बाजूने काम करू शकते. संघातील एक वरिष्ठ खेळाडू म्हणूनही, मी नियमितपणे व्यवस्थापनासोबत माझे इनपुट शेअर करत असतो,” पुजारा म्हणाला.
दुसरीकडे, पुजारा म्हणाला की, आम्ही इंग्लंडमध्ये चांगला खेळ दाखवला होता आणि मालिकेत दमदार पुनरागमन केले होते. आता हाच क्रम न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतही कायम ठेवावा लागणार आहे. पुजाराने राहुल द्रविडच्या कोचिंगवरही एक विधान केले आणि सांगितले की, “त्यांना ज्या प्रकारचा अनुभव आहे, तो आम्हाला मालिकेत मदत करेल.” मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची क्रिकेटच्या दीर्घ फॉरमॅटमधील ही पहिली मोठी परीक्षा असेल. यापूर्वी झालेल्या टी-20 मालिकेत टीम इंडियाने एकतर्फी विजय मिळवला होता.