IND vs NZ 1st Test: कानपुरमध्ये श्रेयस अय्यरचा बोलबाला, कसोटी पदार्पण ठोकले दणकेबाज शतक; दिग्गजांच्या विशेष यादीत झाला सामील
अय्यरने 157 चेंडू खेळत 12 चौकार आणि दोन षटकार खेचून शंभरी धावसंख्येचा पल्ला गाठला आणि आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात धमाकेदार शतक ठोकताना दिग्गजांच्या यादीत आपले नाव लिहिले.
न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) कानपुरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर आपला टेस्ट डेब्यू सामना खेळणारा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी धमाकेदार शतक झळकावले आहे. अय्यरने 157 चेंडू खेळत 12 चौकार आणि दोन षटकार खेचून शंभरी धावसंख्येचा पल्ला गाठला आणि आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात धमाकेदार शतक ठोकताना दिग्गजांच्या यादीत आपले नाव लिहिले. पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा श्रेयस 303 भारतीय (India) कसोटी खेळाडूंमधील फक्त 16 वा क्रिकेटर ठरला आहे. पृथ्वी शॉ हा पराक्रम करणारा शेवटचा भारतीय आणि देशातील सर्वात तरुण खेळाडू होता. यासह भारतीय दिग्गजांच्या एलिट यादीत वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) सारख्या खेळाडूंच्या यादीत अय्यरचाही समावेश झाला आहे. 26 वर्षीय अय्यरने 2017 मध्ये त्याचे वनडे आणि टी-20 पदार्पण केले होते परंतु त्याला पहिली कसोटी कॅप मिळविण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागली. (IND vs NZ 1st Test: श्रेयस अय्यरच्या पदार्पण खेळीवर माजी भारतीय दिग्गज फिदा, ब्लॅक कॅप्सविरुद्ध चतुर फलंदाजीचे गाईले गुणगान)
भारतासाठी लाला अमरनाथ यांनी कसोटी पदार्पणातच इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले. या यादीत सौरव गांगुली आणि शिखर धवन यांच्यासारख्या खेळाडूंचीही नावे आहेत. इतकंच नाही तर कानपुरच्या (Kanpur) या खेळपट्टीवर शतकी खेळी करणारा श्रेयस माजी क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर दुसराच ठरला आहे. दरम्यान पदार्पणाची कसोटी खेळत असलेल्या श्रेयस अय्यरने पहिल्या दिवशी नाबाद अर्धशतक झळकावले आणि रवींद्र जडेजासह शतकी भागीदारी केली. गुरुवारी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने 4 बाद 258 धावा केल्या. तर अय्यर 75 धावा करून क्रीजवर तळ ठोकून उभा होता. तसेच, त्याने जडेजासह पाचव्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी करून संघाला पहिल्या दिवशी मजबूत पकड मिळवून दिली. यानंतर खराब प्रकाशामुळे दिवसाचा खेळ सहा षटकांपूर्वी घोषित करण्यात आला.
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होताच टिम साउदीने जडेजाला बाद करून किवी संघाला मोठा दिलासा दिला. जडेजाने 50 धावा ठोकल्या. या दोघांशिवाय सलामीवीर शुभमन गिलची 52 धावांची अर्धशतकी खेळी आकर्षणाचा केंद्र होती. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणे चांगली सुरुवात करूनही मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरले, तर सलामीवीर मयंक अग्रवाल संधीचा सदुपयोग करण्यात अपयशी ठरला.