IND vs NZ 1st T20I: केएल राहुल ने नोंदवला ऐतिहासिक विक्रम, पाहा न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात बनलेले 'हे' 5 प्रमुख रेकॉर्डस्

टीम इंडियाकडून केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी केली. दोन्ही संघातील या पहिल्या टी-20 दरम्यान अनेक विक्रम नोंदवले आहेत. जाणून घ्या

टीम इंडिया (Photo Credit: IANS)

ऑकलंडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी -20 सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) यजमान न्यूझीलंडचा (New Zealand) 6 गडी राखून पराभव केला. पहिले फलंदाजी करत यजमान संघाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 203 धावांची विशाल धावसंख्या केली. भारतीय संघाने 19 ओव्हरमध्ये 4 गडी गमावून सहज लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून केएल राहुल (KL Rahul) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी अर्धशतकी खेळी केली. श्रेयसने नाबाद 58, तर राहुल 54 धावा करून बाद झाला. राहुलने कर्णधार विराट कोहली सह डाव हाताळला आणि दुसऱ्या विकेटसाठी 99 धावांची शानदार भागीदारी केली. राहुलने 27 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 56 धावा केल्या आणि कोहलीने 32 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 45 धावा फटकावल्या. दोघांनी मह्तवपूर्ण भागीदारी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. अखेरीस श्रेयसने अवघ्या 29 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 58 धावांची नाबाद खेळी करत लक्ष्य गाठले आणि 5 सामन्यांच्या टी -20 मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

दोन्ही संघातील या पहिल्या टी-20 दरम्यान अनेक विक्रम नोंदवले आहेत. जाणून घ्या:

1. न्यूझीलंडविरुद्ध किवी देशांत खेळताना भारताचा हा दुसरा टी-20 विजय आहे. यापूर्वी न्यूझीलंडच्या भूमीवर दोन्ही संघांमध्ये एकूण 5 सामने खेळले गेले होते, त्यापैकी 4 सामने न्यूझीलंडच्या संघाने जिंकले होते. मागील वर्षी ऑकलँडमध्ये भारताने पहिल्यांदा किवीविरुद्ध विजय नोंदवला होता.

2. किवी गोलंदाज मिशेल सॅटनर याने आजच्या सामन्यात भारताचा सलामी फलंदाज रोहित शर्माला बाद केले. रोहितसॅटनरचा टी-20 मध्ये 50 वा शिकार बनला.आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 50 बळी घेणारा न्यूझीलंडचा तिसरा खेळाडू ठरला आहे.

3. केएल राहुलने आजआंतरराष्ट्रीय टी-20 कारकीर्दीचे 10 वे अर्धशतक झळकावले. तो भारताकडून 10 किंवा अधिक अर्धशतकं झळकावणारा चौथा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, रोहित शर्मा, विराट कोहली आणि शिखर धवन यांनी खेळाच्या या स्वरूपात 10 किंवा अधिक अर्धशतकं केली आहेत.

4. भारताने आज चौथ्यांदा यशस्वी रित्या 200 हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला आहे. यापूर्वी भारताने वेस्टइंडीजविरुद्ध हैदराबाद 2019 सामन्यात 208, श्रीलंकाविरुद्ध मोहाली 2009 सामन्यात207 धावा आणि न्यूझीलंडविरुद्ध ऑकलैंडमध्ये 204 आणि 2013 ऑस्ट्रेलिया विरुद्ध राजकोट सामन्यात 202 धावांचे लक्ष्य गाठले.

5. पाच फलंदाजांनी एकाच टी-20 सामन्यात 50 किंवा अधिक धावा केल्याची ही पहिलीच वेळ आहे. मुनरो 59, विल्यमसन 51, रॉस टेलर नाबाद 54, राहुल 56, श्रेयसने नाबाद 58 धावा केल्या.

या मालिकेचा पुढील सामना रविवारी 26 जानेवारीला याच मैदानावर खेळला जाईल. या सामन्यात न्यूझीलंड पुनरागमन करत मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.