IND vs BAN 1st T20I: रोहित शर्मा याने टीम इंडियासाठी केली 'या' विक्रमाची नोंद, एम एस धोनी ही राहिला मागे
रविवारी रोहितने मैदानावर टॉससाठी उतरताच एका विशेष विक्रमाची नोंद केली. आणि माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला पिछाडीवर टाकले. भारतासाठी सर्वाधिक टी-20 सामने खेळणारा रोहित पहिला पुरुष खेळाडू बनला आहे.
भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघात आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे, रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिल्लीमधील आजचा हा सामना रोहितसाठी महत्वाचा आहे. रविवारी रोहितने मैदानावर टॉससाठी उतरताच एका विशेष विक्रमाची नोंद केली. आणि माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याला पिछाडीवर टाकले. भारतासाठी सर्वाधिक टी-20 सामने खेळणारा रोहित पहिला पुरुष खेळाडू बनला आहे. यापूर्वी धोनीने भारतीय संघासाठी एकूण 98 टी-20 सामने खेळले होते. आजचा सामना रोहितच्या टी-20 कारकिर्दीतील 99 वा सामना आहे. सर्वाधिक टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या नावावर आहे. त्याने 111 टी -20 सामने खेळले आहेत. सर्वाधिक टी-20 सामने खेळणाऱ्यांच्या यादीत रोहित आता दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.
दरम्यान, भारतासाठी सार्वधिक टी-20 सामने खेळण्याचा विक्रम (पुरुष/महिला) हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्या नावावर आहे. हरमनप्रीतने काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध टी-20 क्रिकेटमधील 100 वा सामना खेळला होता. 2007 मध्ये पहिल्या टी -20 वर्ल्डकप दरम्यान रोहितने इंग्लंडविरुद्ध जलद क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. या विक्रमासह रोहित सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारा जगातील तिसरा खेळाडू ठरेल. रोहितने 99 सामन्यासह माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याची बरोबरी केली. आफ्रिदीनेदेखी 99 टी-20 सामने खेळले आहेत.
मागील 2 वर्षांत रोहितने स्वत:ला टी-20 चा एक मोठा आणि भक्कम खेळाडू म्हणून सिद्ध केले आहे. या विक्रमाबरोबरच रोहित आज 8 धावा करुन विराट कोहली (Virat Kohli) ला मागे टाकू शकतो. सध्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये विराटने सर्वाधिक धावा केल्या आहेत. रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहली या मालिकेचा भाग नाही. अशा परिस्थितीत रोहितला विराटच्या पुढे जाण्याची संधी असेल.