IND vs AUS, ICC Women's World Cup 2022: टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध अटीतटीची लढाई, ‘या’ भारतीय खेळाडूंवर असणार खास नजर
ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत सलग चार सामने जिंकून मैदानात उतरणार आहे, तर भारतीय संघाने चारपैकी दोन सामने जिंकले असून दोन गमावले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय संघापुढे आपली विश्वचषक मोहीम पुन्हा रुळावर आणण्यासाठी ऑस्ट्रेलियाची घोडदौड रोखण्याचे आव्हान असेल.
IND vs AUS, Women's World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषकाच्या (ICC Women's World Cup) चालू असलेल्या 12 व्या आवृत्तीतील 18 वा सामना उद्या ऑकलंड (Auckland) येथे भारत महिला (India Women) आणि ऑस्ट्रेलिया महिला (Australia Women) यांच्यात खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत सलग चार सामने जिंकून मैदानात उतरणार आहे, तर भारतीय संघाने (Indian Team) चारपैकी दोन सामने जिंकले असून दोन गमावले आहेत. संपूर्ण स्पर्धेत भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी फलंदाजी टीम इंडियासाठी (Team India) डोकेदुखी ठरली आहे. त्याचबरोबर कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हीच खराब फॉर्म देखील संघासाठी चिंतेचा विषय आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने क्षेत्ररक्षणातही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया संघ सर्व खेळलेले चार सामने जिंकून विजयरथावर स्वार आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघापुढे आपली विश्वचषक मोहीम पुन्हा रुळावर आणण्यासाठी ऑस्ट्रेलियाची घोडदौड रोखण्याचे आव्हान असेल. या सामन्यात भारतीय संघाला आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. (ICC Women World Cup Points Table: भारताला ढकलून वेस्ट इंडिज तिसऱ्या क्रमांकावर; दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया 4-4 विजयांसह गुणतालिकेत अव्वल)
1. स्मृती मंधाना
‘नॅशनल क्रश’ स्मृती मंधाना या वेळी विश्वचषक सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-पाच पैकी एक आहे. स्मृतीने आतापर्यंत चार सामन्यात 216 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाच्या समावेश आहे. अशा परिस्थितीत स्मृतीकडून संघाला डावाच्या सुरुवातीला मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. स्मृतीची तडाखेबाज सलामी जोडीदार शेफाली वर्मा सध्या संघाबाहेर असल्यामुळे सांगलीकर फलंदाजावर मोठी जबाबदारी असेल.
2. हरमनप्रीत कौर
मोठे फटके खेळण्यास माहीर भारतीय संघाची अष्टपैलू हरमनप्रीत कौर टीमसाठी सध्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारी दुसरी खेळाडू आहे. हरमनप्रीत आतापर्यंत सातत्याने प्रभावी खेळ करू शकलेली नाही, पण संघाला आणि चाहत्यांना तिच्याकडून 2017 विश्वचषक सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या ताबडतोड खेळीची अपेक्षा असेल. कौरने आतापर्यंत चार विश्वचषक सामन्यात 199 धावा केल्या असून तिच्यावर मधल्या फळीत मोठे फटके खेळण्याची जबाबदारी असेल.
3. मिताली राज
टीम इंडियाची दिग्गज कर्णधार मिताली राज हिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1,055 धावा केल्या आहेत. पण ती सध्या बॅटने संघर्ष करत आहे. गेल्या चारही सामन्यात मिताली बॅटने मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली आहे ज्यामुळे संघाच्या खालच्या फळीवर दबाव वाढला आहे. अशा परिस्थतीत मितालीसमोर आपल्या आवडत्या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध झटपट खेळी करून पुन्हा एकदा लय मिळण्याचे आव्हान असेल.
4. झुलन गोस्वामी
एकदिवसीय क्रिकेट आणि भारतीय संघाची महान वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी देखील कर्णधार मिताली प्रमाणे फारसा प्रभाव पाडू शकलेली नाही. झुलनने आतापर्यंत सर्व चार सामने खेळले असून तिने 5 विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलिया संघात एका-पेक्षा एक धाकड फलंदाज आहेत, जे वेगवान धावा करण्यात शक्ष्म आहेत. त्यामुळे कांगारू संघाच्या धावगतीला वेसण लावण्यासाठी गोस्वामीने सुरुवातीला संघाला काही मोठ्या विकेट मिळवून देणे गरजेचे आहे. झुलन आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे, त्यामुळे आपला नावलौकाला साजेसा खेळ करण्याचे तिच्यावर नक्कीच दडपण असेल.