IND vs AUS 3rd ODI: टीम इंडियापुढे क्लीन स्वीप टाळण्याचे आव्हान, विराट कोहली करणार Playing XI मध्ये बदल? वाचा सविस्तर

मालिकेत भारतीय गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आहे, त्यामुळे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होताना दिसत आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत वनडे 2020-21 (Photo Credit: PTI)

IND vs AUS 3rd ODI: यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) तीन एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने गमावलेला भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) प्रतिष्ठा वाचवण्यासाठी बुधवार, 2 डिसेंबर रोजी मानुका ओव्हलच्या (Manuka Oval) मैदानावर उतरेल. ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला 66 धावांनी आणि दुसर्‍या सामन्यात 51 धावांनी पराभूत केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विराटसेनेचा हा पाचवा पराभव होता. वर्षाच्या सुरूवातीला न्यूझीलंडविरुद्ध त्यांना 3-0 वनडे मालिकेत पराभव पत्करावा लागला होता आणि आता ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर त्यांनी सलग दोन सामने गमावले आहेत. मालिकेत भारतीय गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आहे, त्यामुळे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होताना दिसत आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) भारतीय संघासाठी दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये खूपच महाग सिद्ध झाला आहे, तर नवदीप सैनीने Navdeep Saini) आयपीएलमध्ये जो जबरदस्त फॉर्म दाखवला त्याची पुनरावृत्ती करण्यात तो अपयशी ठरला. (IND vs AUS ODI 2020-21: ‘तुझी खेळभावना कुठे गेली?’, डेविड वॉर्नरच्या दुखापतीवर KL Rahul याच्या विधानावर सोशल मीडिया यूजर्सने फलंदाजाची घेतली क्लास)

भारतीय संघात सध्या शार्दुल ठाकूर, टी-नटराजन आणि कुलदीप यादवसारखे खेळाडू आहेत, ज्यांना तिसर्‍या वनडेमध्ये संधी दिली जाऊ शकते. युजवेंद्र चहल ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही सामन्यांमध्ये फेल ठरला आहे. अशा स्थितीत तिसर्‍या सामन्यात कर्णधार कोहली त्याऐवजी गोलंदाज कुलदीप यादवला संधी देऊ शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कुलदीपने शानदार कामगिरी केली असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने हॅटट्रिक घेतली आहे. सलामीवीर मयंक अग्रवाल दोन्ही सामन्यात वेगवान धावा करण्याच्या प्रयत्नात स्वस्तात बाद झाला. चांगली सुरुवात मिळूनही मयंक मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे, मयंकच्या जागी उपकर्णधार केएल राहुलला टॉप-ऑर्डरवर पदोन्नती दिली जाऊ शकते आणि मधल्या फळीत मनीष पांडेचा समावेश केला जाऊ शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत वेगवान गोलंदाज नवदीप सैनीही अपयशी ठरला असल्याने, तिसर्‍या सामन्यात कर्णधार कोहली सैनीच्या जागी टी नटराजनला पदार्पण करण्याची संधी देऊ शकतो. शिवाय, मध्यम वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरदेखील सैनीची जागा घेण्यासाठी एक पर्याय आहे.

पाहा टीम इंडियाचा संभावित प्लेइंग इलेव्हन: शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर आणि टी नटराजन.