IND vs AUS 2nd Test 2020: MCG मध्ये टीम इंडियाने मारली बाजी, बॉक्सिंग डे टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा 8 विकेटने पराभव करत मालिकेत 1-1ने केली बरोबरी
मेलबर्नच्या मैदानावरील भारताचा हा चौथा विजय ठरला. भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
IND vs AUS 2nd Test 2020: मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) टीम इंडियाने (Team India) 8 विकेटने विजय मिळवत ऑस्ट्रेलियाचा (India) 8 विकेटने दारुण पराभव केला आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. मेलबर्नच्या मैदानावरील भारताचा हा चौथा विजय ठरला. भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. पहिल्या डावातील 122 धावांच्या शतकी खेळीऐवजी रहाणेने दुसऱ्या डावात नाबाद 27 धावा फडकावल्या आणि संघाला विजयीरेष पार करून दिली. रहाणेने दोन्ही डावात पुढाकार घेत फलंदाजी केली. रहाणे वगळता पदार्पणवीर शुभमन गिल (Shubman Gill) नाबाद 35 धावा करून परतला. मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा स्वस्तात माघारी परतले. मयंकने 5 तर पुजारा 3 धावत करू शकला. ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या डावात मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IND vs AUS 2nd Test 2020: मेलबर्न कसोटीमध्ये टीम इंडिया ‘अजिंक्यच’, ‘या’ प्रमुख 5 कारणांमुळे भारताने मालिकेत केले दिमाखात पुनरागमन)
सामन्याच्या पहिल्या दिवशी कांगारू संघाचा पहिला डाव 195 धावांवर गुंडाळत भारताने रहाणेचे शतक आणि रवींद्र जडेजाच्या अर्धशतकी खेळीने326 धावांपर्यंत मजल मारली व 131 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात देखील कांगारू फलंदाजांनी निराशा केली. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे कांगारू फलंदाजांनी गुडघे टेकले आणि एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. कांगारू संघासाठी दुसऱ्या डावात कॅमरुन ग्रीनने सर्वाधिक 45 तर मॅथ्यू वेडने 40 आणि मार्नस लाबूशेनने 28 धावा केल्या. माजी कर्णधार आणि नंबर एक कसोटी फलंदाज स्टिव्ह स्मिथच्या अपयशाची मालिका यंदाही सुरूच राहिली आणि दुहेरी धावसंख्या गाठण्यात अपयशी ठरला. स्मिथ 8 धाव करून बाद झाला.
भारताच्या विजयात कर्णधार रहाणेचे पहिल्या डावातील शतक आणि भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा टीम इंडियाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. संपूर्ण सामन्यात बुमराहने एकूण 6 विकेट घेतल्या, मोहम्मद सिराज सिराज आणि रविचंद्रन अश्विनला प्रत्येकी 5 तर रवींद्र जडेजाने 3 गडी बाद केले.