IND vs AUS 2020-21: संजय मांजरेकर यांचे कमेंट्री बॉक्समध्ये होणार पुनरागमन, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

Mumbai Mirror मधील एका अहवालानुसार 27 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मांजरेकर कमेंट्री पॅनलमध्ये पुनरागमन करणार आहेत.

संजय मांजरेकर (Photo Credits: Instagram)

बीसीसीआयने (BCCI) संजय मांजरेकर (Sanjay Manjrekare) यांना आयपीएल कमेंट्री पॅनेलमधून हटवले होते, पण आता संजय मांजरेकर पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्समध्ये परतणार आहेत. Mumbai Mirror मधील एका अहवालानुसार 27 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India Tour of Australia) मांजरेकर कमेंट्री पॅनलमध्ये पुनरागमन करणार आहेत. सोनी पिक्चर्सने त्यांच्यासह कमेंट्रीसाठी कॉन्ट्रॅक्ट केले आहे. त्यांच्यासमवेत सुनील गावस्कर आणि हर्षा भोगले यांनीही भाष्य करताना दिसू शकतात. शिवाय, माइकल क्लार्क, ग्लेन मैकग्रा आणि अँड्र्यू सायमंड्स सारख्या ऑस्ट्रेलियन भाष्यकारांशीही संपर्क साधला असल्याचे म्हटले जात आहे. माजी भारतीय सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवागशी देखील हिंदी भाष्य करण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे. भारताच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाने 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत घरच्या संघाचा 2-1 असा पराभव केला होता. यंदा देखील कोहली व संघ मालिकेचा बचाव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. (IND vs AUS 2020-21: स्टीव्ह वॉ यांचा ऑस्ट्रेलिया संघाला सल्ला; भारतीय संघाच्या 'या' फलंदाजाला 'स्लेज' करू नका, नाहीतर पडेल भारी!)

अ‍ॅडिलेडमधील मालिकेच्या सलामीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले असले तरी स्वतः कोहलीच्या शतकी खेळीनंतरही पर्थ येथे त्यांचा पुढील सामना गमावला. त्यानंतर कोहली आणि टीमने शानदार पुनरागमन करत मेलबर्न येथे सामना जिंकत मालिका खिशात घातली. दरम्यान, यंदा 27 नोव्हेंबर रोजी तीन वनडे मालिकेसह दौऱ्याची सुरुवात होईल आणि त्यानंतर तितकेच टी-20 सामने देखील खेळले जातील. त्यानंतर डिसेंबर महिन्यापासून चार सामन्यांची कसोटी मालिका होईल. अ‍ॅडिलेड येथे गुलाबी बॉलने कसोटी मालिका सुरु होईल. त्यानंतर 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर दुसरी कसोटी, 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानात तिसरी आणि 15 जानेवारीपासून गब्बा येथे अंतिम कसोटी सामना खेळला जाईल.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला विराट कोहली आणि त्याच्या संघाला स्लेज करू नये म्हणून बजावले आहे कारण या रणनीतीचा उलटा परिणाम होऊ शकतो. ESPNCricinfoने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये वॉ म्हणाले की स्लेजिंग जगातील सर्वोत्कृष्टविरूद्ध कार्य करत नाही.