IPL Auction 2025 Live

IND vs AUS 1st T20I: केएल राहुल, रवींद्र जडेजाची तुफान बॅटिंग, ऑस्ट्रेलियाच्या भेदक मार्‍यापुढे फलंदाजांचा फ्लॉप शो; टीमने दिले 162 धावांचे आव्हान

यजमान गोलंदाजांच्या भन्नाट मार्‍यासमोर टीम इंडियाचे फलंदाज अपयशी ठरले. संघ दीडशे धावांचा टप्पा पार करू शकणार की नाही अशा वेळी जडेजाने जबरदस्त फटकेबाजी केली आणि संघाला सन्मानजनक 161 धावांपर्यंत मजल मारून दिली. 

केएल राहुल, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 1st टी-20 (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs AUS 1st T20I: कॅनबेराच्या (Canberra) मनुका ओव्हल येथे सुरु असलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) भारतीय (India) फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. यजमान गोलंदाजांच्या भन्नाट मार्‍यासमोर टीम इंडियाचे (Team India) फलंदाज अपयशी ठरले. संघ दीडशे धावांचा टप्पा पार करू शकणार की नाही अशा वेळी रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) जबरदस्त फटकेबाजी केली आणि संघाला सन्मानजनक 161 धावांपर्यंत मजल मारून दिली. उपकर्णधार केएल राहुलने (KL Rahul) अर्धशतकी खेळी केली. आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यावर राहुलने संयमी डाव खेळत सर्वाधिक 51 धावा केल्या. शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाही. संजू सॅमसनने 23 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 16 आणि जडेजा नाबाद 44 धावा करून परतला. ऑस्ट्रेलियासाठी मोईसेस हेनरिक्सने (Moises Henriques) 3 विकेट घेतल्या. मिशेल स्टार्कने 2 तर अ‍ॅडम झांपा आणि मिशेल स्वीपसन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IND vs AUS 1st T20I: आरोन फिंचचा टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय, टीम इंडियासाठी वनडेनंतर नटराजनचे टी-20 डेब्यू)

टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात अपेक्षेनुसार झाली नाही. 11 च्या धावसंख्येवर स्टार्कने धवनचा त्रिफळा उडवला आणि स्वस्तात माघारी धाडलं. कर्णधार कोहलीही राहुलला जास्त काळ साथ देऊ शकला नाही. स्वीपसनचा चेंडू खेळताना बॉल विराटच्या बॅटची कड घेऊन हवेत उडाला आणि सोपा झेल पकडत स्वीपसनने विराटला माघारी पाठवलं. कॅनबेराच्या मैदानावर फॉर्मात असलेला राहुलने फटकेबाजी करत अर्धशतक ठोकले. राहुलसह फटकेबाजी करत असताना सॅमसनचा फटका चुकला आणि स्वीपसनच्या हाती सोपा झेल देत माघारी परतला. झांपाने मनीष पांडेला बाद करत संघाला आणखीन एक धक्का दिला. हेनरिक्सच्या धीम्या गतीच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा राहुलचा प्रयत्न फसला आणि सीन एबॉटकडे झेलबाद झाला. हेनरिक्सने मोक्याच्या क्षणी हार्दिकला बाद करत संघाला मोठा धक्का दिला.

यापूर्वी दोन्ही संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली ज्यात यजमान संघाने वर्चस्व गाजवत 2-1 असा विजय मिळवला. त्यामुळे वनडे मालिका गमावली असली तरीही टी-20 मालिकेत भारतीय संघ चांगली कामगिरी करेल अशी सर्वांना आशा आहे.