IND vs AUS 1st ODI: युजवेंद्र चहल वनडेमधील भारताचा सर्वात महागडा फिरकीपटू, सिडनी मॅचमध्ये नोंदवला लाजीरवाणी रेकॉर्ड

आरोन फिंच आणि माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी भारतीय फिरकीपटूला धु..धु धुतलं. या दरम्यान चहलने दहा ओव्हरमध्ये 89 धावा लुटलेल्या. भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमधील स्पिनरने दिलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs AUS 1st ODI: भारताचा (India) फिरकीपटू युजवेंद्र चहलचा (Yuzvendra Chahal) शुक्रवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) नकोशा विक्रमाची नोंद केली. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) सुरु असल्याने पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंच (Aaron Finch) आणि माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) यांनी भारतीय फिरकीपटूला धु..धु धुतलं. या दरम्यान चहलने दहा ओव्हरमध्ये 89 धावा लुटलेल्या. भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमधील स्पिनरने दिलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि डेविड वॉर्नर व फिंचच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 156 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. फिंचने आपले 17 वे एकदिवसीय शतक फटकावले आणि या प्रक्रियेत अवघ्या 126 डावांमध्ये 5000 एकदिवसीय धावा पूर्ण करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा वेगवान खेळाडू ठरला. त्याचा सलामीचा जोडीदार वॉर्नरने सर्वात वेगवान 115 डावात हा टप्पा गाठला आहे. (IND vs AUS 1st ODI: स्टिव्ह स्मिथने झळकावलं करिअरमधील सर्वात जलद शतक, ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाविरुद्ध उभारली सर्वाधिक धावसंख्या)

चहलबद्दल बोलायचे तर फिरकी गोलंदाजाने 2019 वर्ल्ड कप सामन्यात सर्वाधिक 88 धावा लुटलेल्या होत्या. एकदिवसीय सामन्यात कोणत्याही भारतीय खेळाडूने दिलेल्या सर्वाधिक धावांच्या नोंद भुवनेश्वर कुमारच्या नावर आहे. 2015 मध्ये मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वेगवान गोलंदाजाने 106 धावा दिल्या होत्या. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध वनडे सामन्यात तिसरे सर्वाधिक 375 चे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 गडी बाद केले तर जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी आणि युवजेंद्र चहल यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. चहलने आजच्या सामन्यात फिरकी गोलंदाजाने दिलेल्या सर्वाधिक धावा दिल्या शिवाय त्याला एकच विकेट मिळाली. चहलने मार्कस स्टोइनिसला पहिल्याच चेंडूवर माघारी धाडलं. ग्लेन मॅक्सवेलने देखील चहलच्या ओव्हरमध्ये हल्लाबोल केला आणि ओव्हरमध्ये दोन मोठे षटकार लागले.

मालिकेच्या पहिल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आणि पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार फिंच, स्मिथ यांची धडाकेबाज शतकं आणि त्यांना वॉर्नर व ग्लेन मॅक्सवेल यांच्या फटकेबाजीने उत्तम साथ ज्याच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अखेरीस पहिल्या वनडे सामन्यात 374 धावांपर्यंत मजल मारली. आयपीएल गाजवणारे भारतीय गोलंदाज पहिल्या सामन्यात यजमान फलंदाजांपुढे निरुत्तर दिसले. शिवाय, क्षेत्ररक्षणादरम्यान भारतीय खेळाडूंनी केलेल्या गलथान कामगिरीचा फायदा ऑस्ट्रेलियाला मिळाला. यजमान ऑस्ट्रेलियासाठी फिंचने सार्वधिक 114 तर स्मिथने 105 धावांचा डाव खेळला.