IND-A vs AUS-A 2nd Tour Match: भारतीय फलंदाजांचा चौफेर हल्ला; हनुमा विहारी, रिषभ पंत यांच्या शतकी खेळीने दुसऱ्या दिवसाखेर भारताची 472 धावांची आघाडी
दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबल्यावर भारताने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध 472 धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून दुसऱ्या डावात हनुमा विहारी आणि रिषभ पंत यांनी नाबाद शतकी खेळी केली.
IND-A vs AUS-A 2nd Tour Match: भारत-अ (India-A) आणि ऑस्ट्रेलिया-अ (Australia-A) संघातील तीन दिवसीय दिवस/रात्र सराव सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजवर सत्ता गाजवली आणि दुसऱ्या दिवसाखेर 4 विकेट गमावून 386 धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबल्यावर भारताने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध 472 धावांची आघाडी घेतली आहे. पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळी बाधित झाला. पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या भारतीय फलंदाजांनी यंदा गियर बदलला आणि विरोधी संघाच्या गोलंदाजांविरुद्ध चौफेर फेटकेबाजी केली. भारताकडून दुसऱ्या डावात हनुमा विहारी आणि रिषभ पंत यांनी नाबाद शतकी खेळी केली तर मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल यांनी अर्धशतकी खेळी करत संघाच्या आव्हानात्मक धावसंख्येत महत्वाची भूमिका बजावली. शुभमनने 65 तर मयंकने 61 धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेने 38 धावा केल्या तर हनुमा विहारी नाबाद 104 धावा आणि पंत नाबाद 103 धावा करून परतला. (IND-A vs AUS-A 2nd Tour Match: भारतीय गोलंदाजांचा झंझावात, दिवस/रात्र सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर; भारताला 86 धावांची आघाडी)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात 194 धावांवर ऑलआऊट झाल्यावर गोलंदाजांनी संघाला जोरदार पुनरागमन करून दिलं आणि संघाला 108 धावांवर रोखलं. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या अचूक गोलंदाजीपुढे यजमान संघ निरुत्तर दिसले. पहिल्या दिवशी एकूण 20 विकेट पडल्या. ऑस्ट्रेलिया-अ विरुद्ध पावसाने प्रभावित झालेल्या पिंक-बॉल कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताने 86 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात मयंक आणि पृथ्वी शॉ सलामीला आहे. पृथ्वी पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि अवघ्या 3 धावा करून माघारी परतला. पण, नंतर शुभमन आणि मयंकने खिंड लढवली आणि शतकी भागीदारी करत आपली आघाडी वाढवली. शॉ याला वगळता अन्य फलंदाजांनी मोठा डाव खेळला. शुभमन बाद झाल्यावर रहाणेने विहारीला चांगली साथ दिली. रहाणेने चांगली सुरुवात केली, पण मोठी खेळी करू शकला नाही. रहाणेचे 12 धावांनी अर्धशतक हुकले. यानंतर विहारी आणि पंतने शतकी भागीदारी करत संघाची आघाडी चारशे पार नेली. पंतने आजच्या सामन्यात प्रभावी फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. विहारीने 188 चेंडूत 13 चौकारांसह शतक पूर्ण केले.
सामन्याच्या पहिल्या दिवशी टॉस जिंकून भारताने पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला, पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताची हाराकिरी केली. भारताचे धुरंदर स्वस्तात माघारी परतल्यावर बुमराहने कारकीर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले ज्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यात संघाची पकड मजबूत केली. बुमराहने या खेळपट्टीवर आपल्या कारकीर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले ज्याच्यावर भारत आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ फलंदाज धावा करण्यासाठी झगडत होते.