IPL 2022: अजिंक्य रहाणे याला भारतीय कसोटी संघात कमबॅक करण्यासाठी IPL मध्ये करावे लागणार ‘हे’ काम, माजी ओपनरचे मोठे विधान
याशिवाय जर भारतीय संघात परत यायचे असेल तर रहाणेला 600 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील. भारतीय संघात सध्या बदलाचा काळ सुरु आहे. नव्या खेळाडूंच्या आगमनामुळे अनेक अनुभवी फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
IPL 2022: माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राला असे वाटते की अजिंक्य रहाणे याने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून मिळालेल्या संधींचा सर्वोत्तम उपयोग केला नाही. रहाणेने आयपीएल 2022 च्या चार डावांमध्ये आतापर्यंत 72 धावा केल्या आहेत, जे खेळाडू आणि फ्रँचायझीसाठी खूप असमाधानकारक आहे. याशिवाय जर त्याला भारतीय संघात परत यायचे असेल तर रहाणेला 600 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील असे चोप्राने सांगितले. भारतीय संघात सध्या बदलाचा काळ सुरु आहे. कर्णधार बदलानंतर निवड समितीने अनेक नव्या खेळाडूंना संघात संधी दिली आहे. नव्या खेळाडूंच्या आगमनामुळे अनेक अनुभवी फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यात कसोटी संघाचे माजी उपकर्णधार रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचे नाव आहे. या दोघांनाही देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करून पुनरागमन करण्याचा सल्ला निवडकर्त्यांनी दिला आहे.
रहाणे आयपीएलच्या 15 व्या हंगामातील कोलकाता संघाचा भाग आहे. रहाणेने स्पर्धेची सुरुवात 44 धावांची शानदार खेळी केली पण त्यानंतर तो संघर्ष करताना दिसला. भारताचा माजी सलामीवीर आणि आयपीएल समालोचक आकाश चोप्राने रहाणेच्या कसोटी संघाचा मार्ग कठीण असल्याचे सांगितले आहे. आयपीएलमध्ये धावा करून पुनरागमन करण्याचा विचार करत असेल तर 700 धावा कराव्या लागतील, असे चोप्रा यांनी म्हटले. तसे रहाणेचे पुनरागमन शक्य नाही कारण आयपीएल आणि कसोटी क्रिकेटचा काय संबंध आहे? असे सहसा घडते. पण अजिंक्यने त्याच्या वाट्याला आलेल्या संधीचा फायदा नक्कीच घेतला नाही. आता टी-20 मधील कामगिरीच्या जोरावर त्याला कसोटी संघात परतायचे असेल तर किमान 600 ते 700 धावा कराव्या लागतील.
रहाणे गेल्या दोन हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. यंदाच्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या मेगा लिलावात कोलकाता संघाने त्याला 1 कोटी रुपये देऊन आपल्या संघात सामील केले. वेंकटेश अय्यर सोबत तो यंदा संघासाठी डावाची सुरुवात करत आहे. दरम्यान, बुधवारच्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर कोलकाता संघ आयपीएल 2022 गुणतालिकेत आघाडीवर आहे. त्यांनी आता चार सामन्यात 3 विजय आणि एक पराभवासह उत्कृष्ट रनरेट मिळवून पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 चे सिंहासन काबीज केले आहे.