ICC Women's World Cup 2022: महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दोन संघाचा राहिला दबदबा, ‘या’ टीम्सशिवाय फक्त तीन अन्य पोहोचले वर्ल्ड कप नजीक
3 एप्रिल रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषकच्या गेल्या 11 वर्षाच्या इतिहासात फक्त दोन संघांनी आतापर्यंतची सर्व जेतेपदं जिंकली असून तीन अन्य टीम्स याच्या नजीक पोहोचले होते. एका संघाने विजेतेपद पटकावले तर दोन संघाना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
आयसीसी महिला विश्वचषक (ICC Women's World Cup) आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. 3 एप्रिल रोजी क्रीस्टचर्च येथे ऑस्ट्रेलिया (Australia Women) आणि इंग्लंड (England Women) संघात स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने वर्चस्वपूर्ण कामगिरी करून आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले आणि फायनलमध्ये धडक मारली तर गतविजेता इंग्लंडने खराब सुरुवातीनंतर गियर बदलला आणि सेमीफायनल फेरीत बलाढ्य दक्षिण आफ्रिका महिला संघाला मोठ्या फरकाने धूळ चारली. आणि आता दोन्ही संघ विजेतेपदावर नाव करण्याच्या उद्देशाने रविवारी मैदानात उतरतील. उल्लेखनीय आहे की महिला एकदिवसीय विश्वचषकच्या (Women's ODI World Cup) गेल्या 11 वर्षाच्या इतिहासात फक्त दोन संघांनी आतापर्यंतची सर्व जेतेपदं जिंकली असून तीन अन्य टीम्स याच्या नजीक पोहोचले होते. एका संघाने विजेतेपद पटकावले तर दोन संघाना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. (ICC Women's WC: गतविजेत्या इंग्लंडने ऑस्ट्रेलियासोबतच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 137 धावांनी केला पराभव)
1973 पासून सुरु झालेला महिला विश्वचषक 2017 पर्यंत यशस्वीपणे संपन्न झाला आहे. पहिल्या विश्वचषक विजयाचा मान क्रिकेटची मात्रभूमी म्हटल्या जाणाऱ्या इंग्लंडला मिळाला होता. तेव्हापासून ऑस्ट्रेलिया महिला संघ आतापर्यंत सहा वेळा विश्वचषक विजेता बनला आहे तर इंग्लंडने चार आणि न्यूझीलंड महिला संघ एक वेळा विश्वविजेता बनला होता. याशिवाय वेस्ट इंडिज आणि टीम इंडिया देखील वर्ल्ड कप विजयाच्या जवळ पोहोचले होते पण ते मोक्याच्या क्षणी अपयशी ठरले. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील भारताची सर्वोत्तम धावसंख्या 2005 आणि 2017 मध्ये होती जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभूत होऊन टीम इंडिया (Team India) उपविजेते ठरली. मिताली राजने त्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले तसेच 2005 च्या आवृत्तीत तिने सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला.
याशिवाय 2013 मध्ये वेस्ट इंडिजने अंतिम फेरी गाठली होती, पण त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. तसेच त्यापूर्वीच्या आवृत्तीत (2009) न्यूझीलंडला आपले दुसरे विजेतेपद पटकावण्याची संधी मिळाली होती, पण ब्रिटिश महिला संघाने त्यांना पराभवाची चव घेण्यास भाग पाडले. अशा परिस्थितीत आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड महिला संघ पुन्हा एकदा चॅम्पियनशिपचा मान मिळवण्यासाठी उत्सुक असतील. पण ऑस्ट्रेलिया सातवे विजेतेपद जिंकणार की इंग्लंड विजयाचा पंचक करणार याकडे दोन्ही देशातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून असेल.