ICC Women’s T20 World Cup 2020 FINAL: आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2020 स्पर्धेत भारतीय संघाची सर्वोकृष्ट कामगिरी; जाणून घ्या फायनलपर्यंतचा रोमांचक प्रवास

भारतीय संघाला विश्वचषक नावावर करण्यासाठी भारताला आता केवळ एका विजयाची गरज आहे. भारताने याआधी ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांचा पराभव करत इथवर मजल मारली.

Indian Women Team 2018 Photo Credit : Twitter

आयसीसी महिला टी 20 विश्वचषकात भारतीय महिला संघांने अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघाला विश्वचषक नावावर करण्यासाठी भारताला आता केवळ एका विजयाची गरज आहे. भारताने याआधी ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांचा पराभव करत इथवर मजल मारली. भारताने विश्वचषकात एकही सामना गमावलेला नाही. दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनलचा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. मात्र, अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाला पात्र ठरवण्यात आले होते. तसेच पूर्वीच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. भारतीय संघ अ गटात टॉपवर होता. त्याचाच फायदा आज भारतीय संघाला झाला. आता अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाच्या संघासोबत मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर आज होणार आहे. तर, जाणून घेऊया भारतीय संघाचा विश्वचषकातील फायनलपर्यंतचा थरारक प्रवास

 

भारताकडून ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव

पूनम यादवच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने आयसीसी महिला टी-20 विश्वचषकामधील पहिल्याच सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करत भारताने दीप्ती शर्माच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 133 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा संघाला 115 धावांवर गुंळाडले होते. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर विजयासाठी 6 चेंडूत 21 धावांची गरज होती. भारतीय संघाने अखेरच्या दोघा फलंदाजांना धावबाद केले आणि 17 धावांनी विजय मिळवला. भारताकडून पूनम यादवने या सामन्यात सर्वाधिक 4 विकेट घेतले होते. याशिवाय, शिखा पांडेने 2 तर, तर राजेश्वरी गावकवाड एक विकेट घेतली होती.

 

भारताने बांगलादेशवर 18 धावांना मिळवला विजय

माजी जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात 17 धावांनी पराभूत केल्यानंतर दुबळ्या बांग्लादेशवर 18 धावांनी विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेल्या 143 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 124/8 एवढा स्कोअर करता आला. त्यामुळे भारताचा या मॅचमध्ये 18 धावांनी विजय झाला होता. भारताकडून पूनम यादवने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर शिखा पांडे आणि अरुंधती रेड्डीला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या होत्या. राजेश्वरी गायकवाडला 1 विकेट घेण्यात यश आले. बांगलादेशकडून निगार सुलतानाने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली होती.

 

न्यूझीलंड विरोधातील चुरशीच्या सामन्यात भारताचा 3 धावांनी विजय

शानदार प्रदर्शन करत असलेल्या भारतीय संघाने महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव केला होता. चुरशीच्या झालेल्या तिसऱ्या साखळी सामन्यात भारताने तुल्यबळ न्युझीलंडला 3 धावांनी नमवून या रोमहर्षक विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

 

अखेरच्या साखळी सामन्यात भारताचा सलग चौथा विजय

ऑस्ट्रेलिया येथे होत असलेल्या महिला टी-20 विश्वचषकात भारताने अखेरच्या साखळी समान्यात श्रीलंकेचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवला. भारतीय महिला संघाचा हा सलग चौथा विजय मिळवला होता. या सामन्यात राधा यादवने 4, तर राजेश्वरी गायकवाडने 2 विकेट्स काढून श्रीलंकेला नऊ बाद 113 धावांत रोखले. त्यानंतर भारताने तीन विकेट्स गमावून विजयासाठीचे लक्ष्य पंधराव्या षटकात गाठले होते. भारताकडून सलामीवीर शेफाली वर्माने ठसा उमटवला. तिने 34 चेंडूंत 7 चौकार आणि एका षटकारासह 47 धावांची खेळी उभारली होती.

 

भारतीय महिला संघाचा फायनलमध्ये प्रवेश

साखळी सामन्यात भारताने दमदार कामगिरी करुन सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, हा सामना सिडनी मैदानात पार पडणार होता. परंतु, त्या मैदानात पावसाचे सावट असल्याने हा सामना होऊ शकला नाही. विश्वचषकात सर्वोकृष्ट प्रदर्शन करणाऱ्या भारतीय महिला संघाला अधिक फायदा मिळाला होता. आसीसीच्या नियमानुसार, सामना रद्द झाल्यास गुणतालिकेत अव्वल असणारा संघ फायनलमध्ये प्रवेश करतो. या स्पर्धेत एकही सामना न गमवल्यामुळे भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी होता. यामुळे सामना रद्द झाल्याने भारताला फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता.

आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2020 मधील अंतिम लढत होणार असून भारत आणि ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड येथे एकमेकांशी भिडणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना आज दुपारी 12. 30 वा. सुरू होणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघाने चांगल्या कामगिरीच्या जोरावर आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2020 मधील अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. तसेच आसीसी महिला टी-20 विश्वचषक 2020 चा किताब कोण जिंकणार? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.