ICC Board Meeting: टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनावर अद्यापही टांगती तलवार, आयसीसीची बैठक 10 जूनपर्यंत स्थगित
याचे कारण म्हणजे आयसीसीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत गोपनीयतेचा भंग होत असल्याची चिंता होती. आयसीसीने सदस्यांनी गोपनीयतेचा मुद्दा उपस्थित केल्यावर प्रशासकीय मंडळाच्या बैठकीतील सर्व अजेंडा 10 जून 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये यंदा होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धा निश्चित होते की नाही हे जाणून घेण्याची प्रतीक्षा अजून लांबली आहे. याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदच्या (ICC) गुरुवारी झालेल्या बैठकीत गोपनीयतेचा भंग होत असल्याची चिंता होती. आयसीसीने गुरुवारी सांगितले की, सदस्यांनी गोपनीयतेचा मुद्दा उपस्थित केल्यावर प्रशासकीय मंडळाच्या बैठकीतील सर्व अजेंडा 10 जून 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोविड-19 महामारीचा (COVID-19 Pandemic) धोका लक्षात घेता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित होणाऱ्या टी-20 विश्वचषकचे आयोजन करावे की नाही यासारख्या काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. टी -20 वर्ल्ड कप 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. आयसीसी बोर्डाची गुरुवारी टेलिकॉन्फरन्सद्वारे बैठक झाली आणि सर्व गोपनीयतेच्या विषयावर अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेनंतर 10 जून 2020 पर्यंत बैठक पुढे ढकलल्या गेल्या. (टी-20 वर्ल्ड कप स्थगित करून IPL चे आयोजन करण्यावर PCB नाखुश, ICC ला समर्थन देण्यास दिला नकार)
दरम्यान, बोर्डाच्या बर्याच सदस्यांनी अलीकडेच या विषयावर आपली चिंता व्यक्त केली होती आणि त्यांना वाटले की प्रशासनाच्या सर्वोच्च मापदंडांच्या अनुषंगाने मंडळाच्या प्रकरणांचे पावित्र्य आणि गोपनीयता सुनिश्चित करण्यासाठी त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. आयसीसीच्या नीतिशास्त्र अधिका-यांच्या नेतृत्वात आणि जागतिक तज्ज्ञांनी समर्थित स्वतंत्र तपासणी त्वरित सुरू करण्याचा एकमताने करार करण्यात आला.
करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ऑस्ट्रेलियात 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. शिवाय, स्पर्धेचे आयोजन केल्यास अनेक देश प्रेक्षकांविना खेळण्यासाठी तयार नाहीयेत, त्यामुळे यंदाची स्पर्धा रद्द होऊन पुढे ढकलली जाईल अशी चर्चा होती. मात्र आयसीसीने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं समजतंय. दुसरीकडे, टी-20 स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआय आयपीएलचा तेरावा हंगाम खेळवण्याच्या विचारात होती. मात्र आयीसीने बैठक पुढे ढकलल्याने आता आयपीएलच्या तेराव्या हंगामावरही टांगती तलवार आहे.