‘Mohammad Rizwan ने मैदानात हिंदूंसमोर नमाज अदा केली...’ वकार युनूसच्या विधानावर हर्षा भोगले यांनी दिले हे प्रत्युत्तर
वकार युनूस यांनी म्हटले की रिझवानला मैदानावर हिंदूंसमोर प्रार्थना करताना पाहणे त्यांच्यासाठी खूप खास होते.
भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघात आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान, पाकिस्तानी संघाचा सलामीवीर मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) शानदार अर्धशतक झळकावले. त्याने नाबाद 79 धावांची खेळी केली आणि बाबर आजमच्या (नाबाद 68) साथीने आपल्या संघाला 10 गडी राखून विजय मिळवून दिला. 29 वर्षांच्या इतिहासात भारताविरुद्ध विश्वचषक सामन्यात पाकिस्तानचा हा पहिला विजय होता. या विजयानंतर सर्व प्रकारच्या बातम्या आणि वाद निर्माण झाले व नवा वाद रिझवान संदर्भात निर्माण झाला असून त्यावर हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी वकार युनूसच्या (Waqar Younis) वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज आणि प्रशिक्षक वकार युनूस यांनी एक विधान केले आहे ज्यात त्यांनी म्हटले की रिझवानला मैदानावर हिंदूंसमोर प्रार्थना करताना पाहणे त्यांच्यासाठी खूप खास होते.
त्यांच्या या विधानाबाबत सोशल मीडियावर सर्व प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आणि लवकरच भारताचे प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. हर्षा भोगले यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “वकार युनूस सारख्या दिग्गज व्यक्तीसाठी हे सांगणे की रिझवानला हिंदूंसमोर नमाज अदा करताना पाहणे त्यांच्यासाठी खूप खास होते. आज मी ऐकलेली ही सर्वात निराशाजनक गोष्ट आहे. आपल्यापैकी बरेच जण प्रयत्न करत आहेत. अश्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे नाही आणि फक्त खेळाबद्दल बोलतोय, त्यामुळे हे ऐकून खूप वाईट वाटले.” भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत दुबईच्या मैदानावर फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 151 धावा केल्या, ज्यात कर्णधार विराट कोहलीच्या 57 धावांच्या शानदार अर्धशतकाचा समावेश होता. प्रत्युत्तरात पाकिस्तानी संघाने एकही विकेट न गमावता 17.5 षटकांत लक्ष्य गाठले.
वकार युनूसचा व्हायरल व्हिडिओ
बर्याचदा ‘भारतीय क्रिकेटचा आवाज’ म्हणून ओळखला जाणाऱ्या हर्षा यांनी युनिसकडून त्वरित माफीची अपेक्षा केली. क्रिकेटपटू आणि खेळातील दिग्गजांनी क्रिकेट विश्वाला धर्माच्या आधारे विभाजित न करता एकत्र केले पाहिजे, असे मत भोगले यांनी व्यक्त केले. “आपल्या खेळाचे राजदूत म्हणून क्रिकेटपटू थोडे अधिक जबाबदार असतील, असे तुम्हाला वाटेल. मला खात्री आहे की वकारकडून माफी मागावी येईल. आपण क्रिकेट जगताला एकत्र करणे आवश्यक आहे, धर्माच्या आधारे विभागणे नाही,” भोगले यांनी पुढे म्हटले.