‘Halal’ Meat Controversy: टीम इंडियाच्या आहाराच्या शिफारशींच्या वादावर BCCI ने मौन सोडले, म्हणाले- ‘खेळाडू पाहिजे ते खाण्यास मोकळे’

बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी या अफवांचे खंडन केले आणि म्हणाले की, बोर्डाने जारी केलेल्या आहार योजनेबाबत कोणतेही निर्देश नाहीत आणि राष्ट्रीय संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या आहाराच्या निवडीबाबत त्यांची कोणतीही भूमिका नाही. तसेच खेळाडू जे पाहिजे ते खाण्यास स्वतंत्र आहेत.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील कानपूरमधील पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघासाठी (Indian Team) आहाराच्या शिफारशीवरून वाद सुरू झाला कारण खेळाडूंना फक्त ‘हलाल’ मांस (Halal Meat) खाण्याची परवानगी होती. हा विषय लवकरच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आणि आता बीसीसीआय (BCCI) कोषाध्यक्ष अरुण धुमल (Arun Dhumal) यांनी या प्रकरणावर मौन सोडले आहे. अफवानुसार खेळाडूंना कोणत्याही प्रकारे गोमांस आणि डुकराचे मांस न खाण्याचे निर्देश देण्यात आले होते, तर इतर श्रेणीतील मांस फक्त ‘हलाल’ स्वरूपातच खाण्यास परवानगी होती. खाद्यपदार्थांच्या निवडीबाबत अशा शिफारशी कशा करता येतील, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.

धुमल यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, बीसीसीआयची या प्रकरणात कोणतीही भूमिका नाही कारण जेवणाची निवड नेहमीच व्यक्तीच्या पसंतीनुसारच असते. धुमल पुढे म्हणाले की, काय खावे आणि काय नाही हे निवडण्यास खेळाडू स्वतंत्र आहेत, मग ते मांसाहारी असो की शाकाहारी. “बीसीसीआय आपल्या कोणत्याही खेळाडूला काय खावे आणि काय खाऊ नये याचा सल्ला देत नाही. खेळाडू स्वतःचे अन्न निवडण्यास स्वतंत्र आहेत. त्यांना शाकाहारी व्हायचे आहे की नाही, ही त्यांची निवड आहे, त्यांना शाकाहारी बनायचे आहे की नाही, ही त्यांची निवड आहे. त्यांना मांसाहार करायचा की नाही, ही त्यांची निवड आहे,” धुमल म्हणाले.

इंडिया टुडे मधील एका अहवालानुसार, संघ व्यवस्थापन मालिका/टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी आहार योजना ठरवते. मालिकेसाठी केटरिंगची आवश्यकता, खरं तर, नेहमी आयोजिक बोर्डाद्वारे केली जाते. उल्लेखनीय म्हणजे, प्रत्येक वेळी जेव्हा भारतीय संघ परदेशात जातो किंवा परदेशी संघ भारत दौऱ्यावर येतो तेव्हा आहार योजना सामायिक केली जाते आणि बहुतेक वेळा, अगदी मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही, मेनूमध्ये हलाल मांसासाठी निर्देश असतात. न्यूझीलंड मालिकेसाठी भारतीय संघात एक मुस्लिम खेळाडू आहे. दुसरीकडे, यंदा जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर भारत आणि न्यूझीलंड प्रथमच कसोटी मालिकेत आमनेसामने येत आहेत. नोव्हेंबरच्या सुरुवातीला रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने टी-20 मालिका 3-0 ने जिंकली होती, तर अजिंक्य रहाणे 25 नोव्हेंबरपासून कानपूर येथे सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत भारताचे नेतृत्व करेल.