Team India साठी खुशखबर, Jasprit Bumrah आणि Ravindra Jadeja तंदुरुस्त! 'या' मालिकेत करु शकतात पुनरागमन
दोन्ही संघांमधील तीन सामन्यांची टी-20 मालिका 3 जानेवारीपासून आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 10 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे.
IND vs SL 2023: भारतीय क्रिकेट संघाचे यंदाचे वेळापत्रक पूर्ण झाले आहे. चढ-उतारांनी भरलेले 2022 हे वर्ष भारतीय संघासाठी काही खास नव्हते. यावर्षी अनेक स्टार खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर होते, त्यामुळे भारताला आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. या खेळाडूंच्या यादीत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांची नावे आघाडीवर आहेत. या खेळाडूंचे यंदाचे वर्ष दुखापतीमुळे जवळजवळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. भारतीय संघाला आता पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी 2023 मध्ये सामना खेळायचा आहे. भारत वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या सामन्यांनी करणार आहे. दोन्ही संघांमधील तीन सामन्यांची टी-20 मालिका 3 जानेवारीपासून आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 10 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे.
हार्दिक पांड्या असु शकतो कर्णधार
चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समितीने या मालिकेसाठीचा संघ अद्याप जाहीर केलेला नाही. त्यामुळे मंगळवारी भारतीय संघाची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्याला टी-20 मालिकेसाठी कर्णधार बनवण्यात येणार आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा नुकताच बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेदरम्यान जखमी झाला होता. अशा स्थितीत त्याला या मालिकेत खेळणे कठीण वाटत आहे. त्याचबरोबर या टी-20 संघात अनेक बदल पाहायला मिळू शकतात. या मालिकेसाठी निवड समिती युवा खेळाडूंना संधी देऊ शकते. त्याचबरोबर अनेक ज्येष्ठ खेळाडूंची रजा जवळपास निश्चित मानली जात आहे. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याकडे एका नव्या आणि तरुण संघासह कर्णधार म्हणून पाहिले जाऊ शकते. (हे देखील वाचा: KL Rahul Viral Memes: बांग्लादेश विरुध्द सामना जिंकुनही कर्णधर के एल राहुल ट्रोल, सोशल मिडीयावर मिम्स व्हायरल)
बुमराह आणि जडेजा कधी परतणार?
जसप्रीत बुमराह यावर्षी घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेपासून संघाबाहेर आहे. बुमराह पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे. दुसरीकडे, रवींद्र जडेजाबद्दल बोलायचे झाले तर तो आशिया चषकादरम्यान गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. या दुखापतीतून तो सावरला असला तरी. भारतीय संघाला तीन टी-20 सामन्यांनंतर श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकाही खेळायची आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर या मालिकेदरम्यान हे दोन्ही स्टार खेळाडू संघात पुनरागमन करू शकतात. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतात खेळवला जाणार आहे. याआधी हे खेळाडू जितक्या लवकर पुरेशा सरावासाठी संघात परततील, तितकेच त्यांच्यासाठी चांगले होईल. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही या मालिकेत पुनरागमन करू शकतो.