2025 मधील जगातील सर्वोत्तम टेस्ट XI ची फॉक्स क्रिकेटने केली भविष्यवाणी; विराट कोहली Out, पृथ्वी शॉ, शुभमन गिल यांचा समावेश

फॉक्स क्रिकेटच्या या टेस्ट इलेव्हनमध्ये तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये विराट कोहली किंवा रोहित शर्मा यांचा समावेश नाही. सुरुवातीच्या स्लॉटमध्ये त्यांनी पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल या 2018 अंडर-19 वर्ल्ड कप नायकांचा समावेश केला.

पृथ्वी शॉ, विराट कोहली (Photo Credit: Getty)

वर्ष 2025 ला अजून 5 वर्षे बाकी आहेत आणि या दरम्यान क्रिकेट जगात बरेच बदल अपेक्षित आहे. काही नवीन चेहरे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वाला मिळतील, तर सध्याचे प्रसिद्ध चेहरे क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर करतील. या काळात वर्ल्ड कप, टी-20 वर्ल्ड कप आणि दोन आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप खेळले गेले असतील. अशा परिस्थितीत विचार करा, 2025 मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट कसोटी इलेव्हन (World Test XI) कोणती असेल आणि कोणते खेळाडू या संघात सहभागी होणार नाही, कारण 5 वर्षांची मुदत खूप जास्त आहे. धाडसी भाकित वर्तवण्यात ट्रेंड सुरु ठेवत फॉक्स क्रिकेटने (Fox Cricket) 2025 च्या वर्ल्ड इलेव्हनची घोषणा केली. त्यांनी ज्या खेळाडूंना वगळले किंवा ज्यांचा समावेश केला ते पाहून चाहत्यांच्या नक्की भुवया उंचावतील. फॉक्स क्रिकेटच्या या टेस्ट इलेव्हनमध्ये तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) किंवा रोहित शर्मा यांचा समावेश नाही. याशिवाय अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी, ट्रेंट बोल्ट, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनाही स्थान देण्यात आले नाही. (विराट कोहली, सचिन तेंडुलकरसह दिग्गजांचा लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडच्या Non-Honours बोर्ड XI मध्ये समावेश, पाहा लिस्ट)

सुरुवातीच्या स्लॉटमध्ये त्यांनी पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि शुबमन गिल (Shubman Gill) या 2018 अंडर-19 वर्ल्ड कप नायकांचा समावेश केला. पृथ्वीने वनडे आणि टेस्ट फॉरमॅटमध्ये पदार्पण केले असून शुभमनला अद्याप टी-20 आणि टेस्ट टीममध्ये संधी मिळालेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उशीरा वर्चस्व गाजवणाऱ्या डेविड वॉर्नर आणि रोहितला स्थान मिळालेले नाही. तिसऱ्या स्थानावर विराटच्या जागी स्टिव्ह स्मिथला स्थान मिळाले. चौथ्या क्रमांकावर मार्नस लाबूशेनला फलंदाजीसाठी निवडले. लाबुशेनने 2019-20 हंगामात प्रभावी खेळ केला होता. या संघात 5 व्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून बाबर आझमचा समावेश आहे. इंग्लंडच्या अष्टपैलू बेन स्टोक्सचा देखील या संघात समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकला यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून या संघात स्थान मिळालं आहे.

वाहिनीच्या म्हणण्यानुसार, जसप्रीत बुमराहचे वर्चस्व 2025 मधेही अखंड राहील. या संघाच्या गोलंदाजीत भारतीय क्रिकेटमधून फक्त बुमराहचा समावेश करण्यात आला आहे. बुमराहबरोबर दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा आणि ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सचा संघात समावेश करण्यात आला आहे. संघात फक्त एक फिरकी गोलंदाज आहे आणि तो म्हणजे अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खान.

फॉक्स क्रिकेटची 2025 ची वर्ल्ड इलेव्हन:

पृथ्वी शॉ, शुबमन गिल, स्टिव्ह स्मिथ, बाबर आजम, मार्नस लाबूशेन, बेन स्टोक्स, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, कगिसो रबाडा, पॅट कमिन्स आणि रशीद खान.