Darren Sammy Racism Row: 'काळू शब्द नेहमी वर्णद्वेषासाठी वापरला जात नाही', चाहत्याच्या ट्विटवर डॅरेन सॅमीने दिलं सडेतोड उत्तर

त्यावर एका चाहत्याने त्याची समजूत काढण्याची प्रयत्न केली, पण सॅमीनेच परखड मत मांडत गप्प केलं.

डॅरेन सॅमी (Photo Credit: Getty Images)

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) याचा माजी खेळाडू वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी (Darren Sammy) याने अलीकडेच मला काळू म्हणलं जायचं, अशी माहिती दिली होती. टीममधले काही जणच मला या वर्णद्वेषी (Racism) नावाने हाक मारायचे, असं सॅमी त्याच्या इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये म्हणाला. त्यावर एका चाहत्याने त्याची समजूत काढण्याची प्रयत्न केली, पण सॅमीनेच परखड मत मांडत गप्प केलं. अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय इसमाच्या मृत्यूनंतर वर्णद्वेषाचा मुद्दा गेले काही दिवस चांगलाच चर्चेत आहे. सॅमीसह क्रिस गेलं, ड्वेन ब्रावो यांनी या प्रकरणावर मत व्यक्त केलं. फक्त फुटबॉलमध्येच नाही तर क्रिकेटमध्येही खेळाडूंना वर्णद्वेषाचा सामना करावा लागतो असं विधान गेलने केलं होतं. तर सॅमीने आयसीसीला याबद्दल भूमिका घेण्याचं आवाहन केलं. (IPL Racism: डॅरेन सॅमीला इशांत शर्माने म्हटले होते 'काळू', वर्णद्वेषाचा आरोप केल्यावर जुनी इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल)

ट्विटर यूजरने पोस्ट केलं की, “डॅरेन सॅमी, तुला माहिती असावं म्हणून सांगतो, काळू हा शब्द नेहमी वर्णद्वेष व्यक्त करण्यासाठी वापरला जात नाही. भारतीय कुटुंबांमध्ये काही वेळा प्रेमाने किंवा टोपणनावाप्रमाणे अशी हाक मारली जाते. माझी आजी मला याच नावाने हाक मारायची. त्यामुळे तो शब्द कशाच्या संदर्भात उच्चारला गेला आहे, त्यावर त्यामागची भावना समजते. कधी कधी हा शब्द वर्णद्वेषासंदर्भात वापरतात, पण प्रत्येक वेळी तोच अर्थ असेल असं नाही”, असं सॅमीला ट्विट करून समजावण्याचा प्रयत्न केला. यावर सॅमीने सडेतोड उत्तर दिलं आणि त्यांची बोलती बंद केली. सॅमी म्हणाला, “जर काळू या शब्दाला वर्णद्वेषाची किनार असेल, तर तो शब्द कोणीच वापरू नये.”

दरम्यान, 'काळू' या शब्दाचा अर्थ मला आत्ता कळाला, त्यावेळी काळू म्हणजे काहीतरी चांगला शब्द असेल, असं मला वाटलं होतं. या सगळ्याबद्दल आता मला राग येतोय, अशी पोस्ट सॅमीने इन्स्टाग्रामवर शेअर केली. आणि ज्यांनी त्याला 'त्या' नावाने संबोधलं, त्यांना तो मेसेज करणार असल्याचंही सॅमी म्हणाला. "मला त्या नावाने कोण हाक मारायचं हे त्यांना माहिती आहे. मला त्या नावाने हाक मारल्यावर टीममधले सगळे जण हसायचे, त्यामुळे हे काहीतरी मजेशीर असेल असं मला वाटायचं," सॅमी म्हणाला.