T20 सामन्यात भारतीय क्रिकेटपटूने ठोकले झंझावाती द्विशतक, 17 चौकार आणि 17 षटकार खेचत अशी किमया करणारा बनला पहिला फलंदाज
दिल्लीकर सुबोध भाटी टी-20 क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. एका क्लब टी-20 स्पर्धेत त्याने 79 चेंडूत 205 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 17 षटकार आणि 17 चौकार खेचले.
टी-20 क्रिकेटमध्ये दररोज काही ना काही विक्रम बनत आणि तुटत असतात. क्रिकेट चाहत्यांना टी-20 क्रिकेटचा हा नवीन फॉरमॅट चाहत्यानांही पसंत पडत आहे. दिल्लीकडून (Delhi) रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या एका 30 वर्षीय फलंदाजाने या फॉरमॅटमध्ये दुर्मिळ अशी कामगिरी केली आहे. दिल्लीकर सुबोध भाटी (Subodh Bhati) टी-20 क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. एका क्लब टी-20 स्पर्धेत त्याने 79 चेंडूत 205 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 17 षटकार आणि 17 चौकार खेचले. सुबोधच्या खेळीच्या जोरावर दिल्ली इलेव्हन (Delhi XI) संघाने सिंबाविरुद्ध (Simba) 1 विकेट गमावून 256 धावांचा डोंगर उभारला. सुबोधनंतर टी-20 मध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावांचा रेकॉर्ड यापूर्वी वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलच्या नावावर होता.
गेलने आयपीएल 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (RCB) टीमकडून खेळत पुणे वॉरियर्स विरोधात 66 चेंडूत 175 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे, जागतिक क्रिकेटमध्ये गेलव्यतिरिक्त एबी डिव्हिलियर्स, रोहित शर्मा, विराट कोहली, आंद्रे रसेल, किरोन पोलार्ड असे या फॉरमॅटमधील दिग्गज खेळाडू देखील टी-20 मध्ये दुहेरी शतक ठोकण्याचा पराक्रम करण्यात अपयशी ठरले आहेत. सुबोधच्या खेळीबद्दल बोलायचे तर त्याने संघाच्या 80 टक्के धावा स्वतःच केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 259.49 होता. त्याच्या व्यतिरिक्त दिल्ली XI चे आणखी दोन फलंदाज, सचिन भाटीने 25 धावा केल्या तर कर्णधार विकास भाटीने 6 धावा केल्या. तसेच, 30 वर्षीय सुबोधने 8 प्रथम श्रेणी, 24 लिस्ट-ए आणि 39 टी-20 सामन्यात दिल्लीचे प्रतिनिधित्व केले आहेत. त्याने प्रथम श्रेणीमध्ये 147 धावा, लिस्ट-ए संयत 132 धावा आणि टी-20 मध्ये 120 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने एकूण 103 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याने प्रथम श्रेणीत 19 विकेट्स, लिस्ट-एमध्ये 37 आणि टी -20 मध्ये 47 फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. 2015/16 च्या हंगामात तो दिल्लीचा नियमित स्टार्टर होता.
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंचच्या नावावर आहे. फिंचने 2018 मध्ये हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध 76 चेंडूत 172 धावा केल्या होत्या. यामध्ये 16 चौकार व 10 षटकरांचा समावेश होता. त्याचबरोबर फिंच व्यतिरिक्त अफगाणिस्तानच्या हजरतुल्ला झझाईने 2019 मध्ये आयर्लंडविरुद्ध 62 चेंडूत नाबाद 162 धावांचा डाव खेळला.