DC vs KXIP, IPL 2020: सुपर थरार! रोमहर्षक सुपर ओव्हरमध्ये सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विजयी, मयांक अग्रवालची अर्धशतकी खेळी व्यर्थ

सुपर-ओव्हरमध्ये मॅचचा निर्णय घेण्यात आला आणि दिल्ली कॅपिटल्सने अखेर रोमहर्षक विजय मिळवला. सुपर ओव्हरमध्ये दिल्लीला 3 धावांचे आव्हान मिळाले जे श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतच्या जोडीने सहज गाठले.

दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: Twitter/DelhiCapitals)

इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) पहिल्या सामन्यात मार्कस स्टोइनिसच्या (Marcus Stoinis) विक्रमी 20 चेंडूत अर्धशतकी खेळी करत दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध (Kings XI Punjab) 157 धावांपर्यंत मजल मारून दिली. दिल्लीने दिलेल्या 158 धावांच्या प्रत्युत्तरात पंजाबने मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) अर्धशतकाच्या जोरावर 157 धावा केल्या आणि सामना टाय झाला. मयंकने पंजाबला विजयाच्या जवळ आणलं, पण स्टोइनिसने अखेरच्या षटकात दोन बळी घेत सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. सुपर-ओव्हरमध्ये मॅचचा निर्णय घेण्यात आला आणि दिल्लीने अखेर रोमहर्षक विजय मिळवला. पहिल्या चेंडूवर केएल राहुलने 2 धावा काढल्या, मात्र दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला आणि तिसऱ्या चेंडूवर निकोलस पूरनला कगिसो रबाडाने (Kagiso Rabada) बोल्ड केले. सुपर ओव्हरमध्ये दिल्लीला 3 धावांचे आव्हान मिळाले जे श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतच्या जोडीने सहज गाठले. दिल्लीकडून रविचंद्रन अश्विन आणि रबाडाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या, तर मोहित शर्मा आणि अक्षर पटेल यांनी 1 विकेट मिळाली. किंग्स इलेव्हनकडून सलामी फलंदाज मयंकने सर्वाधिक 89 धावा केल्या. (DC vs KXIP, IPL 2020: मार्कस स्टोइनिसने केली षटकार चौकार-षटकारांची बरसात, वीरेंद्र सेहवागच्या 8 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची केली बरोबरी)

पंजाबकडून राहुल आणि मयंकने डावाची सुरुवात केली. राहुल मोठे शॉट खेळत असताना मयंक सावध फलंदाजी करताना दिसला. राहुलला 21 धावांवर मोहित शर्माने क्लिन बोल्ड करत पंजाबला मोठा धक्का दिला. त्यांनतर दिल्लीकडून पहिला सामना खेळणाऱ्या आर अश्विनने आपल्या सहाव्या ओव्हरमध्ये पंजाबला दोन मोठे झटके दिले. करूण नायरला बाद केल्यानंतर अश्विनने पूरनला शून्यावर बाद केलं. त्यांनतर रबाडाने दुसऱ्याच चेंडूवर महागडया ग्लेन मॅक्सवेलला 1 धावावर माघारी पाठवले. सरफराज खान 12 धावांवर बाद झाला. मयंक एका बाजूने फलंदाजी करत असताना दुसऱ्या टोकाला विकेट पडत होत्या. एकही खेळाडू मयंकला जास्त काळ साथ देऊ शकला नाही.

यापूर्वी राहुलने टॉस जिंकला आणि दिल्लीला पहिले फलंदाजी करण्यास सांगितले. गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. मोहम्मद शमी आणि इतर गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे पहिल्याच सामन्यात दिल्लीची गाडी रुळावरुन घसरली पण स्टोइनिसच्या विक्रमी अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने 157 धावांपर्यंत मजल मारली. स्टोइनिसने अखेरच्या ओव्हरमध्ये तुफान फलंदाजी केली. त्याने 52 धावा केल्या आणि दिल्लीची गाडी रुळावर आणली. श्रेयसने 32 चेंडूत 39 धावा केल्या आणि पंतने 31 धावा केल्या. दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. चोरटी धाव घेण्याच्या नादात सलामी फलंदाज शिखर धवन भोपळा न फोडता माघारी परतला. यानंतर पृथ्वी शॉ देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. हेटमायरकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण शमीने त्याला बाद करून दिल्लीची अवस्था अधिक बिकट केली. 13 धावांवर 3 बाद अशी स्थिती असताना श्रेयस आणि पंतने दिल्लीचा डाव सावरला. चौथ्या विकेटसाठी दोघांनी 73 धावांची भागीदारी केली, पण पदार्पणचा सामना खेळणाऱ्या रवि बिश्नोईने पंतला माघारी धाडत दोघांची जोडी मोडली.