Why is Rohit Sharma Not Playing vs CSK: मुंबई इंडियन्सला ऐनवेळी बदलावा लागला कर्णधार, चेन्नईविरुद्ध ‘या’ कारणामुळे रोहित शर्मा नाही उतरला मैदानात

पहिल्या सामन्यासाठी रोहित पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि म्हणूनच तो चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध सामन्यातून बाहेर बसणार आहे. अशा स्थितीत संघाला ऐनवेळी कर्णधार बदलावा लागला. स्फोटक फलंदाज किरन पोलार्डला रोहित शर्माच्या जागी संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

Why is Rohit Sharma Not Playing vs CSK: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ रविवारी दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात त्यांचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) शिवाय मैदानात उतरणार आहे. रोहित काही दिवसांपूर्वी मँचेस्टर हून अबू धाबीला  (Abu Dhabi) पोहोचला होता. पहिल्या सामन्यासाठी रोहित पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि म्हणूनच तो चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाविरुद्ध सामन्यातून बाहेर बसणार आहे. अशा स्थितीत संघाला ऐनवेळी कर्णधार बदलावा लागला. स्फोटक फलंदाज किरन पोलार्डला (Kieron Pollard) रोहित शर्माच्या जागी संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. कोरोनामुळे आयपीएल (IPL) 2021 पुढे ढकलण्यात आले होता. यानंतर तब्बल तीन महिन्याच्या विश्रांतीनंतर लीग रविवारी पुन्हा सुरु झाली, ज्याचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान खेळला जात आहे. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याला आयपीएलचा 'एल क्लासिको' म्हटले जाते. (IPL 2021 CSK vs MI Match 30: चेन्नईचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय; मुंबईची धुरा पोलार्डच्या हाती, हार्दिक OUT; अशी आहे दोन्ही संघाची प्लेइंग 11)

दरम्यान, सामना सुरू होण्यापूर्वी, जेव्हा कर्णधारांना नाणेफेकीसाठी बोलावण्यात आले, तेव्हा मुंबई इंडियन्सचा स्टार किरोन पोलार्ड रोहितच्या जागी मैदानात येत असल्याचे पाहून चाहते देखील आश्चर्यचकित झाले. नाणेफेक गमावल्यानंतर किरोनने ‘हिटमॅन’च्या प्रकृतीविषयी अपडेट दिली. तो म्हणाला, “आज नाही पण रोहितची प्रकृती उद्या ठीक होईल. आज मी संघाचा कर्णधार आहे.” दुसरीकडे, रोहित वगळता धाकड अष्टपैलू हार्दिक पांड्या देखील आजच्या सामन्याला मुकणार आहे. रोहितच्या अनुपस्थितीत क्विंटन डी कॉक सोबत ईशान किशन सलामीला उतरेल तर चौथ्या स्थानावर त्याच्या जागी अनमोलप्रीत सिंहने पदार्पण केले आहे. तसेच हार्दिकच्या जागी सौरभ तिवारी संघात परतला आहे. विकेटकीपर डी कॉक, कॅप्टन पोलार्ड, अॅडम मिल्ने आणि वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट अशा चार विदेशी खेळाडूंसह मुंबई आज चेन्नईविरुद्ध खेळत आहे.

लक्षात घ्यायचे की पोलार्ड सहाव्यांदा मुंबई इंडियन्सचे कर्णधार म्हणून नेतृत्व करत आहे. यापूर्वी त्याने पाच वेळा मुंबई संघाचे कर्णधारपद भूषवले आहे, त्यापैकी त्याने चार सामने जिंकले आहेत. त्यामुळे कर्णधार म्हणून त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. गेल्या वर्षी देखील युएई येथे झालेल्या लीगच्या अंतिम क्षणी रोहित शर्माला दुखापत झाल्याने पोलार्डने काही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळली होती.