IPL Auction 2025 Live

Coronavirus: भारत महिला टीमचा इंग्लंड दौरा स्थगित, ECB ने 1 जुलैपर्यंत क्रिकेटवर लगावली संपूर्ण बंदी

बोर्डाने कोरोनाच्या वाढत्या घटना लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या या निर्णयामुळे 25 जूनपासून सुरू होणार्‍या भारतीय महिला संघाचा इंग्लंड दौरा तात्पुरता पुढे ढकलण्यात आला आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) कोविड-19 आजारामुळे 1 जुलैपर्यंत इंग्लंड आणि वेल्समध्ये कोणतेही क्रिकेट खेळले जाणार नसल्याचे शुक्रवारी जाहीर केले. बोर्डाने कोरोनाच्या वाढत्या घटना लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गामुळे यावेळी संपूर्ण जगात क्रिकेट पुढे ढकलण्यात आले आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने सांगितले की, आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करण्यासाठी नवीन कार्यक्रम तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल. जुलै ते सप्टेंबर अखेर इंग्लंडच्या या क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिजचा दौरादेखील आहे. इंग्लंड बोर्डाच्या या निर्णयामुळे 25 जूनपासून सुरू होणार्‍या भारतीय महिला संघाचा (India Women's Team) इंग्लंड दौरा तात्पुरता पुढे ढकलण्यात आला आहे. 9 जुलै रोजी संपणार्‍या इंग्लंडच्या दोन आठवड्यांच्या अल्प दौऱ्यावर भारतीय महिला संघ चार वनडे आणि दोन टी-20 सामने खेळणार होती. टॉन्टन आणि ब्रिस्टलमध्ये भारताला टी -20 सामने खेळायचे होते, तर वॉरेस्टर, चेल्म्सफोर्ड, कॅन्टबरी आणि होव येथे चार एकदिवसीय सामने खेळले जाणार होते, परंतु कोरोना विषाणूने संपूर्ण मालिकेवर ब्रेक लावला आहे. (सौरव गांगुली ने क्रिकेट चाहत्यांना दिला झटका, BCCI अध्यक्ष म्हणाले- 'नजीकच्या काळात क्रिकेट होणे कठीण')

ईसीबी पुढील आठवड्यात नवीन 100 लीग स्पर्धेवर चर्चा करेल. बोर्डाचे प्रमुख टॉम हॅरिसन म्हणाले, "सर्वकाही सुरक्षित होईपर्यंत कोणतेही क्रिकेट खेळले जाणार नाही. सरकारचे निर्देश येतील तेव्हाच आमचे सर्व क्रिकेट कार्यक्रम पुढे नेले जातील आणि त्यास अनुमती दिली जाईल." दरम्यान, काऊन्टी चॅम्पियनशिप हंगामासाठी सामन्यांच्या 9 दिवसांच्या चार फेऱ्या वाया गेल्या आहेत पण वनडे आणि कसोटी क्रिकेटच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. "आम्ही या उन्हाळ्यात काही क्रिकेट देऊ शकू अशी आशा आहे, आम्ही जगभरातील संकटात सापडलो आहोत आणि आमचे प्राधान्य... असुरक्षित, मुख्य कामगार आणि समाजाचे संरक्षण करण्यासाठी असेल," हॅरिसन यांनी एका निवेदनात म्हटले.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 जुलैपासून सुरू होणारी वनडे आणि टी-20 मालिकादेखील पुढे ढकलण्यात आल्याची बातमी इंग्रजी माध्यमाद्वारे समोर आले आहे. ही मालिका दोन महिने पुढे ढकलण्यात आली आहे. इंग्लंड-ऑस्ट्रेलियामध्ये 3 ते 16 जुलै दरम्यान तीन टी -20 आणि 3 वनडे सामाने खेळवले जाणार होते. टी-20 मालिकेपासून या दौऱ्याची सुरुवात होणार होती, पण कोरोना व्हायरसने मालिका पुढे ढकलण्यास भाग पाडले आहे.