AUS-W vs IND-W D/N Test: भारत-ऑस्ट्रेलिया ऐतिहासिक गुलाबी कसोटी अनिर्णित, शतकवीर Smriti Mandhana सामनावीर
पावसाने बाधित या एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 272 धावांचे अशक्य लक्ष्य ठेवले. चौथ्या आणि शेवटच्या दिवशी सामना अनिर्णित झाला तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने दोन गडी गमावून 36 धावा केल्या होत्या. स्मृती मंधानाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
AUS-W vs IND-W D/N Test: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील एकमेव दिवस/रात्र कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. पावसाने बाधित या एकमेव कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात आठ गडी गमावून 377 धावा केल्यावर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी 9 गडी गमावून 241 धावा करत आपला डाव घोषित केला. भारताने दुसऱ्या डावात 3 गडी गमावून 135 धावांवर डाव घोषित केला. अशाप्रकारे पहिल्या डावात मोठी आघाडीच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियासमोर 272 धावांचे अशक्य लक्ष्य ठेवले. चौथ्या आणि शेवटच्या दिवशी सामना अनिर्णित झाला तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने दोन गडी गमावून 36 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात 127 आणि दुसऱ्या डावात 31 धावा करणाऱ्या स्मृती मंधानाला (Smriti Mandhan) सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
भारताकडून दुसऱ्या डावात शेफाली वर्माने 52, पूनम राऊतने नाबाद 41 आणि स्मृती मंधानाने 31 धावा केल्या. शेफाली वर्माची कसोटी क्रिकेटमधील जबरदस्त कामगिरी सुरूच आहे. 17 वर्षीय शेफालीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या डावात शानदार अर्धशतक झळकावले आहे. शेफालीने कसोटी कारकिर्दीत चौथ्या डावातील फक्त तिसरे अर्धशतक आहे. मंधाना आणि शेफालीमध्ये पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी झाली. मंधानाने 31 धावा केल्या आणि सोफी मोलिनूच्या चेंडूवर गार्डनरच्या हाती झेलबाद झाली. यानंतर 52 धावा करून शेफाली जॉर्जिया वॉरहॅमच्या गोलंदाजीवर माघारी परतली. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध चौथ्या दिवशी रात्रीच्या जेवणापूर्वी आपला पहिला डाव 9 बाद 241 धावांवर घोषित केला. अशाप्रकारे भारताला 136 धावांची मिळाली.ऑस्ट्रेलियाची अॅलिस पेरी 68 धावांवर नाबाद राहिली तर अॅशले गार्डनरने 51 धावा केल्या. भारताकडून पूजा वस्त्राकरने तीन तर झुलन गोस्वामी, मेघना सिंह आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
दुसरीकडे, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग 17 धावा करून नाबाद राहिली. बेथ मुनीने 11 आणि एलिसा हिलीने 6 धावा केल्या. याशिवाय, भारताकडून झुलन गोस्वामी आणि पूजा वस्त्राकारने प्रत्येकी एक गडी बाद केला. पहिल्या दोन दिवशी पावसामुळे 80 हून अधिक षटके वाया गेली, ज्यामुळे चार दिवसांच्या सामन्याची ड्रॉ होण्याची शक्यता निर्माण झाली.