Ashwin Dismisses Steve Smith For Duck at MCG: बॉक्सिंग डे टेस्टमध्ये स्टिव्ह स्मिथवर नामुष्की, अश्विन 'ही' कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज

2016 नंतर स्मिथ कसोटीत शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs AUS 2nd Boxing Day Test: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि मधल्या फळीतील घातक फलंदाज स्टिव्ह स्मिथला (Steve Smith) भारतीय गोलंदाज रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) पुन्हा एकदा आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि भोपळाही न फोडू देता कांगारू फलंदाजाला माघारी धाडलं. भारताविरुद्ध (India) चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांची सुरुवात यजमान ऑस्ट्रेलियाने (Australia) विजयाने सुरुवात केली असली तरी अनुभवी फलंदाज स्मिथची सुरुवात चांगली ठरली नाही. अश्विनने पहिल्या सामन्यात स्मिथला 1 धावांवर माघारी धाडलं आणि दुसरा सामना कांगारू फलंदाजाला आणखी लाजिरवाणा ठरला. स्मिथसाठी भारताविरुद्ध खेळली जाणारी ही कसोटी मालिका आतापर्यंत चांगली सिद्ध झाली नाही. आतापर्यंत तो टीम इंडियाचा फिरकीपटू अश्विनविरुद्ध अपयशी ठरला आहे आणि त्यामुळे असे काही घडले जे आजवर त्याच्या कसोटी कारकीर्दीत झाले नव्हते. 2016 नंतर स्मिथ कसोटीत शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. (IND vs AUS 2nd Test 2020: मॅथ्यू वेडेचा झेल घेण्याच्या प्रयत्नात शुबमन गिल व रवींद्र जडेजा यांच्यात झाली टक्कर, अष्टपैलूने पकडलेला सुपर कॅच पाहून तुम्हीही म्हणाल-‘कडक’)

इतकंच नाही तर स्मिथ भारताविरुद्ध एकूण 2660 धावा करून पहिल्यांदा शून्यावर बाद झाला आहे. यासह, अश्विन स्मिथला शून्यावर बाद करणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे. बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यात स्मिथने 113 च्या सरासरीने फलंदाजी रेकॉर्ड नोंदवला आहे, त्यामुळे, त्याला भारताविरुद्ध अत्यंत धोकादायक मानले जात आहेत. मात्र, 5व्या ओव्हरमध्ये अश्विनने स्मिथला चेतेश्वर पुजाराच्या लेग स्लिपवर झेलबाद करून संघाला मोठे यश मिळवून दिले. सध्याच्या कसोटी मालिकेदरम्यान, स्मिथने फिरकी गोलंदाज अश्विनच्या चेंडूवर विकेट सहज गमावण्याची ही दुसरीच वेळ आहे. सध्याच्या कसोटी मालिकेच्या तीन डावात स्मिथला केवळ दोन धावाच करता आल्या आहेत. पाहा स्मिथच्या विकेटचा हा व्हिडिओ:

दरम्यान, टॉस गमावून पहिले गोलंदाजी करत पहिल्या सत्रात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. जसप्रीत बुमराहने पहिले जो बर्न्सला बाद करत प्रभावी सुरुवात केली, त्यानंतर अश्विनने दुहेरी दणका देत स्मिथ आणि मॅथ्यू वेडला पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. वेडने 30 धावा केल्या. आता लंचनंतर मार्नस लाबूशेन आणि ट्रेव्हिस हेडच्या जोडीवर संघाला मोठी धावसंख्या करून देण्याची जबाबदारी आहे.