Robin Uthappa Arrest Warrant: रॉबिन उथप्पाविरोधात अटक वॉरंट जारी, लाखोंच्या घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या काय आहे प्रकरण
भारताच्या माजी फलंदाजावर 23 लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण 4 डिसेंबरपर्यंतचे आहे.
Robin Uthappa Arrest Warrant: भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पाविरुद्ध (Robin Uthappa) घोटाळ्याप्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. उथप्पा यांच्यावर ईपीएफओ म्हणजेच भविष्य निर्वाह निधीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप आहे. भारताच्या माजी फलंदाजावर 23 लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण 4 डिसेंबरपर्यंतचे आहे. भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा यांच्यावर सेंच्युरी लाईफस्टाईल ब्रँड प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापन करताना कर्मचाऱ्यांच्या पगारातून ₹ 23 लाख कापल्याचा आरोप आहे, परंतु तो त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केला नाही.
रॉबिन उथप्पाकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही
रॉबिन उथप्पा विरुद्ध अटक वॉरंट पीएफ प्रादेशिक आयुक्त षदक्षरी गोपाल रेड्डी यांनी जारी केले होते, त्यांनी कर्नाटकच्या पुलकेशीनगर पोलिसांना यावर आवश्यक कारवाई करण्यास सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की वॉरंट 4 डिसेंबर रोजी जारी करण्यात आले होते परंतु रॉबिन उथप्पा पुलकेशीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी नव्हते, उथप्पा दुबईमध्ये आपल्या कुटुंबासह राहतात. वॉरंट जारी झाल्यानंतर या प्रकरणी भारतीय फलंदाज रॉबिन उथप्पाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आता 23 लाखांच्या घोटाळ्याच्या आरोपावर उथप्पा काय बोलतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
रॉबिन उथप्पाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
भारतीय फलंदाज रॉबिन उथप्पाने 2006 मध्ये इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. उथप्पाने 42 एकदिवसीय सामने आणि 12 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले ज्यात त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 25.94 च्या सरासरीने 934 धावा केल्या आणि टी20 सामन्यांमध्ये 24.90 च्या सरासरीने आणि 118.00 च्या स्ट्राइक रेटने 249 धावा केल्या. एकदिवसीय सामन्यात त्याच्या सर्वोच्च धावा 86 होत्या. या काळात रॉबिनने 6 अर्धशतकेही झळकावली. T20 मध्ये त्याला फक्त एकदाच अर्धशतक झळकावता आले होते, तर T20 मध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 50 धावा होती.