Ajinkya Rahane ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर; शेअर केली भावूक पोस्ट

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत त्याने चाहत्यांचे आभार मानले.

Ajinkya Rahane (Photo Credit - X)

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे. रहाणेने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत आपल्या क्रिकेट प्रवासाबद्दल चाहत्यांचे आभार मानले. "कॅप २७८ इथेच थांबतो. वर्षानुवर्षे दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. कायम ऋणी राहीन," असे त्याने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

अजिंक्य रहाणेची भावूक पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane)

Ajinkya Rahane च्या कारकिर्दीचा आढावा

अजिंक्य रहाणेने २२ मार्च २०१३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते आणि तो भारताचा २७८ वा कसोटीपटू ठरला होता. जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याने आपली शेवटची कसोटी खेळली. याशिवाय त्याने वनडे आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रहाणेने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडसारख्या देशांमध्ये परदेशी भूमीवर शतके झळकावली होती. स्लिपमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठीही तो ओळखला जात असे.

कर्णधार म्हणून कामगिरी

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेने भारताचे नेतृत्व करत २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर मालिकेत संघाला विजय मिळवून दिला होता. अ‍ॅडलेड कसोटीत ३६ धावांत सर्वबाद झाल्यानंतरही संघाने केलेली ही पुनरागमन कामगिरी क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात कायम राहिली आहे. नक्की वाचा: Ind Team For SL Test: श्रीलंका कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा; संघात 33 वर्षीय खेळाडूची अनपेक्षित निवड.  

आयपीएलमधील भूमिका

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली, तरी रहाणे आयपीएलमध्ये सक्रिय आहे. सध्या तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार आहे. यापूर्वी त्याने मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांचेही प्रतिनिधित्व केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement