निवृत्तीमधून U-Turn घेणाऱ्या अंबाती रायडू याला विजय हजारे ट्रॉफीसाठी हैदराबाद क्रिकेटने दिली 'ही' मोठी जबाबदारी
मागील विजय हजारे ट्रॉफीमध्ये तो संघाचा हैदराबादचा कर्णधारही होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने सेमीफायनलची फेरी गाठली होती.
भारताच्या विश्वचषक 2019 संघात स्थान गमावल्यानंतर अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याने क्रिकेटमधून निवृत्ती केली होती. पण, काही वेळापूर्वी त्याने निवृत्तीवरून परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने आयपीएल, भारतीय संघ तसेच घरगुती सामन्यांच्या निवडीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. घरगुती सामन्यांमध्ये तो हैदराबाद (Hyderabad) कडून खेळतो. निवृत्तीनंतर मैदानात पुनरागमन करणाऱ्या रायुडूला विजय हजारे ट्रॉफीसाठी (Vijay Hazare Trophy) हैदराबाद संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. 33 वर्षीय रायुडू भारतासाठी 4 व्या क्रमांकावर फलंदाजी करीत होता परंतु विश्वचषकच्या भारतीय संघात त्याला स्थान मिळू शकले नाही. मागील विजय हजारे ट्रॉफीमध्ये तो संघाचा हैदराबादचा कर्णधारही होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने सेमीफायनलची फेरी गाठली होती. (अंबाती रायुडू याच्या निवृत्तीवर चाहत्यांनी साधला निशाणा, 3D यू-टर्नवर ट्रोल करत उडवली खिल्ली)
ईएसपीएनक्रिकइन्फो या संकेतस्थळाच्या अहवालानुसार अक्षत रेड्डी याच्या जागी रायडूला टीमची कमान देण्यात आली आहे. तर, बी संदीप याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सेमीफायनलमध्ये संघाला मुंबईकडून पराभव पत्करावा लागला होता. देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या यादी ए स्पर्धेसाठीही हैदराबाद संघात मोहम्मद सिराज याला देखील स्थान मिळाले आहे. जानेवारीत सिराजने ऑस्ट्रेलियाकडून भारतासाठी अंतिम वनडे सामना खेळला होता पण त्यानंतर त्याला संघात स्थान मिळालेले नाही. पी अक्षत रेड्डी, तन्मय अग्रवाल, ठाकूर टिळक वर्मा आणि रोहित रायडू यांनीही हैदराबाद संघात स्थान मिळवले आहे. रोहित रायडूने मागील विजय हजारे ट्रॉफी उपांत्य सामन्यात 121 धावा फटकावल्या पण तरीही संघ विजयी झाला नाही.
हैदराबाद संघ:
अंबाती रायडू (कॅप्टन), बी.व्ही. संदीप (उपकर्णधार), पी. अक्षत रेड्डी, तन्मय अग्रवाल, ठाकूर टिळक वर्मा, रोहित रायडू, सीव्ही मिलिंद, मेहदी हसन, साकेत साई राम, मोहम्मद सिराज, मक्कल जयस्वाल, जे मल्लिकार्जुन (यष्टीरक्षक), कार्तिकेय काक, टी रवी तेजा, आणि अजय देव गौर.